सोशल मीडिया हे अलीकडे मनोरंजनाचे एक नवीन माध्यम झाले आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकजण वेगळ्या प्रकारचा कंटेट तयार करतात. मराठीतील अनेक कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनयाव्यतिरिक्त कंटेट तयार करत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. अशा अनेक कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांतीच्या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील उत्तम प्रतिसाद मिळत असतो.
सोशल मीडियावर एखाद्या कलाकृतीचे कौतुक केले जाते. त्याचप्रमाणे अनेकजण नकारात्मक प्रतिसादही व्यक्त करत असतात. प्रत्येक कलाकाराला सोशल मीडियावर त्यांच्या फोटो व व्हिडीओखाली अनेक वाईट कमेंट्स येत असतात. अनेक कलाकार याकडे दुर्लक्ष करतात. मात्र बरेच कलाकार या नकारात्मक कमेंट्स करणाऱ्यांना त्यांच्या खास अंदाजात उत्तर देतात. यापैकीच एक क्रांती रेडकरही आहे .
सोशल मीडियावरील क्रांती रेडकरचे व्हिडीओ नेहमी चर्चेत असतात. कारण क्रांती तिच्या अनोख्या शैलीत दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या दोन जुळ्या गोंडस मुलींचे व्हिडीओ पाहण्यासाठी तर चाहते आतुरतेने वाटत पाहत असतात. नुकताच क्रांतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये तिनं लेकींचा किस्सा सांगितला आहे.

नुकताच क्रांतीने तिच्या सोशल मीडियावर लेकींच्या करामती सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. क्रांतीच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रतिक्रियांदरम्यान, एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने कमेंट करत “तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही खूप ओव्हर (अति) करता?” असं म्हटलं आहे. यावर क्रांतीनेही या नेटकऱ्याला हटके उत्तर देत “हो वाटतं” असं म्हटलं आहे.
दरम्यान, क्रांतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे. “गोदोचा विषयचं लय हार्ड आहे बाबा… ती थेट बोलणारी आहे”, “गोदो रॉक क्रांती शॉक”, “ती फक्त प्रॅक्टिकल आहे” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.