झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील एजे व लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडतेय. एजे व लीला ही एकमेकांच्या विरोधी स्वभावाची जोडी एकत्र येईल का, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
मालिकेत नुकताच एजे व लीला यांच्या लग्नाचा ट्विस्ट पाहायला मिळाला. श्वेताऐवजी एजेचे लग्न हे लीलाबरोबर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. मालिकेतील हा ट्विस्ट मालिकेच्या चाहत्यांना आवडला असला तरी एजेच्या सूनांना ही गोष्ट काही पटलेली नाही. एजेलादेखील श्वेताऐवजी त्याचे लीलाबरोबर लग्न झालेले पटलेले नाही. याबद्दल त्याने लीलावर राग व्यक्त केला होता. तसेच लीलानेही एजेचा विश्वासघात केल्याचे त्याने म्हटले होते.
यानंतर आता लीलाने जहागीरदारांच्या घरात प्रवेश केला आहे. मात्र ही गोष्ट एजेंच्या सूनांना पटलेली नाही. अशातच आता नुकताच मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या नवीन प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या नवीन प्रोमोमध्ये एजेंची आई सरोजिनी लीलाबरोबर घराबाहेर पडल्या आहेत. घरातल्या कुणालाच काहीच न् सांगता त्या लीलाबरोबर घराबाहेर पडल्या आहेत.
त्यामुळे सर्वजण चिंतेत पडले असून एजे आईला फोन करतो तेव्हा एजेची आई असं म्हणते की, “अभिराम जशा तूला तुझ्या सूना महत्त्वाच्या आहेत. तशी माझी सूनही माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मी आता घरी येईन तर माझ्या सूनेला सोबत घेऊनच येईन.” कथानकातील हा नवीन ट्विस्ट सध्या प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. तसेच या प्रोमोला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओखाली “खूपच छान, खूपच मस्त, आता मज्जा येणार” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे कथानकात पुढे काय होणार? एजे-लीला पुन्हा एकत्र येणार का? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.