टीव्ही हे मनोरंजनाचे सक्षम माध्यम म्हणून ओळखले जाते. टीव्हीवरील मालिका या अनेकार्थाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत असतात. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार व बदलत्या रुचीनुसार निर्माते अनेक नवनवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशातच कलर्स मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून याचं नाव ‘अंतरपाट’ असं आहे. ‘कलर्स मराठी’च्या या आगामी मालिकेच्या एका नवीन व हटके प्रोमोने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘अंतरपाट’ मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या प्रोमोमध्ये गौतमी (रश्मी अनपट) व क्षितिजचा (अशोक ढगे) लग्नसोहळा होताना दिसत आहे. गौतमी नटून-थटून आनंदात लग्नमंडपात येते. तिला पाहून क्षितिजचे आई-वडील खूप आनंदी होतात. त्यानंतर मंगलाष्टका होतात. मग पुढे लग्न विधी सुरू असतानाच क्षितिज गौतमीकडे एक गोष्ट मागतो, ते म्हणजे घटस्फोट. भरमंडपातच क्षितीज घटस्फोटाची मागणी करतो, जे ऐकून गौतमीला धक्का बसतो. “नशीबानं मांडला लग्नाचा घाट पण नियतीने धरला दुराव्याचा अंतरपाट…”, असं कॅप्शन देत प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
काही दिवसांआधी या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला होता, ज्यात गौतमीच्या हळदीचा समारंभ सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते. लव्ह मॅरेजच्या काळात अरेन्ज मॅरेज करणाऱ्या गौतमीला परफेक्ट जोडीदार मिळाल्याने ती अतिशय आनंदी असल्याचे या प्रोमोद्वारे दाखवण्यात आले होते. या पहिल्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. अशातच हा नवीन प्रोमोही प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, ‘अंतरपाट’ या नवीन मालिकेत अभिनेत्री रश्मी अनपट व अभिनेता अशोक ढगे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय अभिनेत्री रेशम टिपणीस, तृष्णा चंद्रत्रे असे बरेच कलाकार पाहायला मिळणार आहेत. ही मालिका येत्या १० जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दररोज संध्याकाळी ७.३० वाजता ‘अंतरपाट’ मालिका प्रसारित होणार आहे.