‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या नव्या मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे व मानसी नाईक मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचं समोर आलं. मालिकेच्या या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसादही दिला. यानंतर आता मालिकेच्या दुसऱ्या आणि नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या नव्या प्रोमोमध्ये मालिकाविश्वातील नवा चेहरा पाहायला मिळत आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘गोठ’ या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता समीर परांजपे या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (sameer paranjape new serial)
या नव्या मालिकेत समीर तेजस प्रभुच्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये समीरची दमदार एन्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये, गायत्री प्रभु म्हणजेच मानसी कुलकर्णी वाड्याचं कॉन्ट्रॅक्ट करताना दिसत आहे. यावेळी प्रभु कुटुंबातील प्रत्येकाच्या सह्या कॉन्ट्रॅक्टवर झालेल्या असतात. फक्त एका व्यक्तीची सही झालेली नसते. आणि ती म्हणजे तेजसची. तेजसला त्याच्या वहिनीचा हा निर्णय मान्य नसतो. “सही मिळणार नाही”, असं म्हणतं तेजसची एन्ट्री होते.
त्यावर गायत्री तेजसला ऐकवताना दिसते. ती असं म्हणते की, “पाच पैसे कमवायाची लायकी नाही आणि मिजास बघा केवढी?”, हे ऐकून तेजस संतापून बोलतो, “वहिनी आता जर बोललो ना…”. पण तितक्यात तेजसचा दादा अडवतो. “जरा गप्प बस, तिच्याच पगारावर आपलं घर चालतंय”. त्यानंतर दुसरा भाऊ “तात्यांची औषधं पण संपली आहेत तेजस”, असं बोलताना दिसतो. पण तेजस कोणाचंच काही ऐकत नाही. तो घरी आलेल्या अधिकाऱ्यांना म्हणतो, “काय आहे ना साहेब, गायत्री प्रभुंसाठी ही वास्तू म्हणजे प्रॉपर्टी आहे हो. आमच्यासाठी गौरवशाली इतिहास आहे. त्याच काय?”.
यावर गायत्री म्हणते, “चुलीत घाला तो इतिहास. मुकाट्याने सही कर, नाहीतर आतापर्यंत खर्च केलेले सगळे पैसे टाक. त्याशिवाय तुला घरात पाऊल टाकू देणार नाही”. यावर हसत हसत तेजस म्हणतो, “देणार हो वहिनी. तुमचे सगळे पैसे व्याजासकट परत करणार. पण सही देणार नाही”. हे ऐकून वाड्याच्या कॉन्ट्रॅक्टसाठी घरी आलेले अधिकारी निघून जातात. त्यानंतर तेजसला ती ऐकवते, “मला फक्त हरलेले चेहरे बघायला आवडतात”. तेव्हा तेजस म्हणतो, “मला पण”. एकूणच हा रहस्यमय असा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. कमेंटवरून हा प्रोमो प्रेक्षकांना आवडला असल्याचं दिसत आहे. यानंतर आता साऱ्यांच्या नजरा मालिकेकडे लागून राहिल्या आहेत.