‘तेरी मेरी यारी मग भो**त गेली दुनियादारी’, ‘मेव्हणे मेव्हणे मेहुण्यांचे पाहुणे’, ‘सस्ती चिजो का शॉक हम भी नही रखते’ अशा अनेक डायलॉग्जने मराठी प्रेक्षकांचे मन वळवणारा चित्रपट म्हणजे ‘दुनियादारी’. उत्तम कथानाक, उत्तम गाणी व उत्तम कलाकारांच्या उत्तम अभिनयाने नटलेल्या ‘दुनियादारी’ चित्रपटाला आता ११ वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. ११ वर्षांपूर्वी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अशातच आता हा चित्रपट पुन्हा एकदा पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
मैत्री, प्रेम व दुरावा याला विनोदाची झालर असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश; सोकयावर घेतला होता. अशातच ११ वर्षानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटगृहांत ‘दुनियादारी’ करायला हा चित्रपट सज्ज झाला आहे. महाराष्ट्रातील काही मोजक्याच चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या पुन:प्रदर्शनाची पोस्ट शेअर केली आहे. मुंबई, कांदिवली, आकुर्डी, भिवंडी, घाटकोपर, पुणे अशा काही मोजक्याच ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी, वर्षा उसगावकर, संदीप कुलकर्णी, प्रणव रावराणेसह अनेक कलाकारांची मांदियाळी होती. यामधील शिरीन, प्रीतम, श्रेयस, डीएसपी, मिनू, साई, एमके, सॉरी, सुरेखा ही पात्रेही विशेष लक्षात राहिली. तसेच ‘दुनियादारी’तल्या गाण्यांचीही वेगळीच जादू प्रेक्षकांवर झाल्याचे पाहायला मिळाले. तर संजय जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘दुनियादारी’च्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार?, यात कोणते नवीन चेहरे असणार की नाही? यासाठी अनेक चाहते आतुर आहेत.