‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या सुप्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय पात्र रोशन सिंह म्हणजे गुरुचरण सिंह बेपत्ता झाला असल्यापासून त्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. आता अखेर २५ दिवसांनंतर रोशन सिंह पुन्हा परतला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोढीची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेला हा अभिनेता गायब होता. त्यामुळे त्याचे वडील, कुटुंबीय काळजीत होते. पोलिसात हरवल्याची तक्रार करत एफआयआरही दाखल करण्यात आला. मात्र अभिनेत्याचा काहीच पत्ता नव्हता. गुरुचरण इतके दिवस कुठे आणि काय करत होता याचा खुलासा त्याने केला आहे. (Gurucharan Singh Back To Home)
‘आज तक’च्या वृत्तानुसार, गुरुचरण सिंग स्वतः घरी परतला आहे. तो आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. यादरम्यान अभिनेत्याने खुलासा केला की तो धार्मिक यात्रेला गेला होता. संसाराचा त्याग करुन तो घरातून निघून गेला. या २५ दिवसांत तो कधी अमृतसर तर कधी लुधियाना येथे होता. त्याच्या म्हणण्यानुसार अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये मुक्काम केला होता. आणि आता घरी परतले पाहिजे हे कळताच तो पुन्हा घरी आला.
गुरुचरण चरण सिंह २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला रवाना होणार होता. मात्र तो मुंबई शहरात पोहोचला नसल्याचे २६ एप्रिल रोजी समोर आले. दिल्ली विमानतळावर तो दिसला पण त्यानंतर तो कुठे गेला हे कोणीच पाहिले नाही. त्यानंतर वडिलांनी पालम पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. ज्यामध्ये रोज नवनवीन सुगावे मिळत होते. परंतु अभिनेत्याबद्दल काहीही सापडले नाही.
अभिनेता लग्न करणार असल्याचीही बातमी होती आणि तो आर्थिक संकटाशीही झुंजत होता. मात्र त्यांनी या काळात त्यांच्या खात्यातून व्यवहार केले होते. एटीएममधून पैसे काढतानाचे फुटेज समोर आले. १४ हजार रुपये काढल्याचे सांगण्यात आले. या तपासात पोलिसांना अनेक गोष्टी समोर आल्या. त्याची १० हून अधिक आर्थिक खाती सापडली आणि अनेक जीमेल खाती सापडली. एक फुटेज सापडले ज्यामध्ये तो ई-रिक्षातून आणि नंतर पायी जातानाही दिसला.