मुंबईचा प्रवास म्हटलं की लोकल ट्रेन ही आलीच. प्रत्येक मुंबईकर या स्वप्ननगरीत आपल्या स्वप्नाना पूर्ण करण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करतो असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. प्रत्येक मुंबईकरांच्या आयुष्यात ही लोकल ट्रेन अविभाज्य घटक आहे. मात्र लोकल ट्रेनची गर्दी ही कुणालाही चुकलेली नाही. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडताना आणि रात्री काम आटपून घरी परतताना प्रत्येक चाकरमान्याला या गर्दीतून जावेच लागते. लोकलचा प्रवास, प्रवाशांची गर्दीतील भांडण हे सर्वकाही प्रत्येक मुंबईकराला अनुभवावं लागतं. बरेचदा गर्दीतून प्रवास करताना या गर्दीला मुंबईकर कंटाळलेला असतो. (Aishwarya Narkar Shared Memories)
या मुंबईच्या गर्दीचा प्रवास आता काही मराठी कलाविश्वातील कलाकारांनाही चुकलेला नाही. या कलाकारांच्या संघर्षाच्या काळात ही मंडळी लोकल ट्रेन, बसने प्रवास करायचे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने ट्रेनच्या गर्दीची जुनी आठवण काढत एक व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ त्यांच्या प्रवासादरम्यानच्या जुन्या दिवसांची आठवण करुन दिली आहे. मात्र हा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन गमतीशीर अंदाजात शेअर केला आहे.
ऐश्वर्या यांनी आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर त्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. ऐश्वर्या यांचे अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. अशातच ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावरुन ट्रेनच्या प्रवासादरम्यानचा अनुभव एका रील व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ ही शाळेतील प्रार्थना गाण्याच्या स्वरुपात जोडली आहे. यावर कॅप्शन देत त्यांनी असे लिहिले आहे की, “डोंबिवली फास्टमधून प्रवास करताना कळायचं ही प्रार्थना शाळेत का शिकवली”. एकूणच डोंबिवली फास्टमधून प्रवास करताना शक्तीची आवश्यतकता होती हे त्यांनी या व्हिडीओतून सांगितलं आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.