होळी हा संपूर्ण देशात साजरा होणारा एक प्राचीन सण आहे. देशभरात सर्वच प्रदेशांमध्ये हा रंगांचा सण साजरा होतो. प्रत्येक प्रदेशात हा सण साजरा करण्याची पद्धत, परंपरा वेगवेगळी असली तरी उत्साह आणि आनंद सारखाच असतो. होळीच्या आठ दिवस आधी होळाष्टक येते. होळाष्टकादरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. होळीच्या ८ दिवस आधी म्हणजेच फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून होळाष्टकास सुरुवात होते. होळाष्टक कधी पाळले जाते आणि ते अशुभ का मानले जाते याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (Holashtak 2024 Date)
यंदाच्या होळीची चाहूल सुरु झालेली पाहायला मिळत आहे. कॅलेंडरनुसार, यावर्षी होळीचा सण २४ व २५ मार्च रोजी सगळीकडे साजरी केली जाणार आहे. यावेळी होलिका दहन रविवार २४ मार्च रोजी होणार आहे. तर २५ मार्च रोजी धूलिवंदन म्हणजेच रंगीत होळी साजरी केली जाणार आहे. तर १७ मार्चपासून होळाष्टकास सुरुवात होणार आहे. कारण, होळीच्या आठ दिवस आधी होळाष्टक सुरु होईल आणि २४ मार्चला संपेल.
मान्यतेनुसार, होळाष्टकादरम्यान आठ ग्रह उग्र स्थितीत राहतात. अष्टमी तिथीला चंद्र, नवमी तिथीला सूर्य, दशमी तिथीला शनि, एकादशी तिथीला शुक्र, द्वादशी तिथीला गुरू, त्रयोदशी तिथीला बुध, चतुर्दशी तिथीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू. त्यामुळे होळाष्टकाच्या वेळी शुभ कार्ये केली जात नाहीत. कारण, या ग्रहांचा शुभ कार्यांवर अशुभ प्रभाव पडतो. अशा ग्रहांच्या प्रभावामुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
होळाष्टकात भगवान विष्णू, हनुमानजी व भगवान नरसिंह यांची पूजा केली जाते, असे मानले जाते. याशिवाय हे आठ दिवस महामृत्युंजय मंत्राचा जप करणे देखील शुभ मानले जाते. याशिवाय जप केल्यास ग्रहांचा अशुभ प्रभावही काही प्रमाणात कमी होतो.