Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding : प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांच्या आयुष्याचा प्रवास आता नवीन वळणावर आला आहे. त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली आहे. मैत्री, प्रेम व त्यानंतर लग्न असा हा त्यांचा प्रवास त्यांनी पार पाडला आहे. अखेर मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे लग्नबंधनात अडकले आहेत. मित्र परिवार व जवळच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत मुग्धा -प्रथमेश यांचा विवाहसोहळा चिपळून येथे पार पडला आहे. अगदी पारंपरिक अंदाजात त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे.
२१ डिसेंबररोजी मुग्धा व प्रथमेश यांचा लग्नसोहळा पार पडला. सोशल मीडियावर मुग्धा-प्रथमेशच्या विवाहसोहळ्यातील फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला. अनेक कलाकारांनी देखील दोघांना सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या. मुग्धाने आमचं झालंय असं कॅप्शन देत लग्नातील खास क्षण शेअर केले होते.
मुग्धा-प्रथमेशच्या लग्नातील एक भावुक करणारा फोटो समोर आला आहे. मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो रिपोस्ट केला आहे. मंगलाष्टकांच्यावेळी मुग्धाच्या डोळ्यात पाणी आलेलं या फोटोत पाहायला मिळालं. नव्या आयुष्याला सुरुवात करण्याआधी मुग्धाच्या डोळ्यातील हे अश्रू बरंच काही सांगताना दिसले. मुग्धा व प्रथमेशच्या लग्नात दोघांनी धमाल, मस्ती केल्याचंही पाहायला मिळालं. लग्नातील दोघांच्या लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
प्रथमेश-मुग्धाच्या पारंपरिक पद्धतीने साजरा केलेल्या लग्नसोहळ्याबरोबरच या दोघांची हळदही चर्चेत राहिली. अत्यंत साधेपणाने व घरच्या घरी उरकल्या हळदीच्या फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवलेली पाहायला मिळाली. दोघांनी पारंपरिक थाटात हळदीचा समारंभ साजरा केल्याने प्रेक्षकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नात कलाक्षेत्रातील कलाकार मंडळींची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.