Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : गेल्या काही दिवसांत हिंदीसह मराठीतील अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकले. अशातच अभिनेत्री सुरुची अडारकार व अभिनेता पियुष रानडे यांनीही एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर आलेल्या त्यांच्या लग्नाच्या फोटोंमुळे साऱ्यांनाच धक्का बसला. सुरुची-पियुष यांच्या मेहंदी व हळदी समारंभाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या लूकमधील फोटोंनासुद्धा चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी चाहत्यांसह अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
सुरुची-पियुष यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे “आनंदाचा दिवस” असं म्हणत त्यांच्या लग्नाचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले होते. सुरुची-पियुष यांच्या नात्याविषयी कुणालीही कल्पना नव्हती. सुरूचीचे हे पहिलेच लग्न असून पियुषचे याआधी दोन लग्न झाली आहेत. त्यामुळे त्याच्या या लग्नामुळे सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. यावर अभिनेत्याने त्याचे मत मांडले आहे. सुरुची-पियुष यांनी लग्नानंतर प्रथमच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल व लग्न होताच त्यांना सोशल मीडियावर मिळालेल्या प्रतिसादावर खुलेपणाने संवाद साधला.
आणखी वाचा – “नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप…”, पियूष रानडेचा बायकोसाठी खास उखाणा, पाहा खास व्हिडीओ
यावेळी मुलाखतीत पियुषने असे म्हटले की, “लग्नानंतर आमच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या. मी ज्यांना अगदी चांगलं ओळखतो किंवा जे मला मी कसा आहे हे खूप चांगले जाणतात. ते खुश आहेत. त्यामुळे ज्यांना मी माहीतच नाही आहे, ते काय करतात किंवा काय बोलतात याने मला काहीही फरक पडत नाही किंवा त्याच्याशी मला काही घेणंदेणंही नाही. हे इतकं सहज व सोपे आहे आणि मुख्यत: माझी माणसं आणि आम्ही दोघे खुश आहोत. त्यामुळे कुणी काही बोललं तरी मला फरक पडत नाही.”
यापुढे सुरुची उत्तर देत असं म्हणाली की, “जितकी लोकं आहेत तितकीच मतं असणार आहेत. प्रत्येकाची मतं त्याच्यासाठी महत्त्वाची असतात. पण कुणाच्यातरी मतामुळे आपल्यात बदल का करायचा? हे साहजिकच आहे. तुम्हाला वाईट वाटत असेल तर काहीही हरकत नाही. पण त्यामुळे आपल्याला वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. माझ्या आयुष्यातील एखादी गोष्ट मला करायची असेल आणि त्यावर माझ्या ओळखीच्या १० लोकांची मतं वेगळी असू शकतात. पण तरी काही हरकत नाही. त्याचं वाईट वाटून घेऊन मी काय करु? मी ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकते त्यांना मी समजावू शकते. पण ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही त्यांना भविष्यात त्या गोष्टी कळतीलच आणि इथेच विषय संपतो.”