देशाच्या राजकारणातील मोठे नाव असलेले नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याचा उलगडा झाला. नवोदित अभिनेता राहुल चोपडा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर आता प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. (Gadkari Movie Trailer Out)
नितीन गडकरी यांच नाव देशाच्या राजकारणात अग्रस्थानी आहे. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी त्यांनी सर्वाधिक काळ काम केलं आहे. त्यामुळे “हायवे मॅन ॲाफ इंडिया” अशी त्यांची ओळख बनली आहे. नितीन गडकरी या नावाला भारतात जेवढ्या उंचीवर स्थान आहे, तितकेच हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदरणीय आहे. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. ही उत्सुकता चित्रपटाच्या पोस्टरपासून ते टीझरपर्यंत तर अगदी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरपर्यंत कायम राहिली आहे.
गडकरी चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’ या प्रवासाने झालेली पाहायला मिळतेय. गडकरी यांचं बालपण, निवडणुकीचा पराभव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक, समाजकारण, जीवघेणा हल्ला अशा विविध पैलूंची झलक ‘गडकरी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या खासगी आयुष्याच्या प्रवासाचे दर्शनही चित्रपटात पाहायला मिळतेय. भारतातील पहिला एक्सप्रेस वे, कमीत कमी खर्चात बांधण्याचा निर्णय आणि त्यासाठी करावी लागलेली धडपड असा कष्टाचा प्रवास ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला. या ट्रेलरची जमेची बाजू म्हणजे नितीन गडकरी यांच्याबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही झलक चित्रपटात पाहायला मिळाली.
नितीन गडकरी यांच्या कारकिर्दीतील अनेक चढ-उतार तसेच राजकीय, खासगी आयुष्य या चित्रपटातून उलगडणार आहे. नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहे. या व्यतिरिक्त चित्रपटात नितीन गडकरी यांच्या मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख ही कलाकार मंडळी दिसतील. तर पत्रकाराची भूमिका तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे. अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित ‘गडकरी’ हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘ए.एम सिनेमा’ आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, ‘अक्षय देशमुख फिल्म्स’ निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.