पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यात देशाला यश मिळालं. पण त्यानंतर पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली. भारताने पाकिस्तानचे बरेच हल्ले परतावून लावले. मात्र देशाच्या सुरक्षिततेसाठी लढताना काही जवानांना वीरमरण पत्करावं लागलं. अजूनही भारत-पाकिस्तान सीमेलगत दोन्ही देशांमध्ये चकमक सुरुच आहे. यामध्ये आता आणखी एका जवानाला वीरमरण आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जवान संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात दोन हात करताना वीरमरण आलं. आज (२४ मे) ब्राम्हणवाडा गावात जवान संदीप यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. (martyr sandip pandurang last rites)
अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावात राहणारे संदीप मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. गेली सात वर्ष ते देशसेवेचं काम करत होते. गुरुवारी (२२ मे) सकाळी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड सेक्टर परिसरातील सीमेलगत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात संदीप यांना जीव गमवावा लागला. मात्र शेवटपर्यंत ते दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत होते. शेवटच्या श्वासापर्यंत संदीप यांनी केलेली देशसेवा उल्लेखनीय आहे.
अंतिम दर्शनासाठी संदीप यांना जेव्हा गावी आणण्यात आलं तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. संदीप यांच्या मूळगावी त्यांचं पार्थिव आणण्यात आलं. पतीला शेवटचं पाहत असताना पत्नीला भावना अनावर झाल्या. संदीप यांच्या पत्नी व लहान मुलीला पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. संदीप यांची पत्नी संपूर्ण प्रसंगाला धैर्याने सामोरी गेली.
संपूर्ण गावात शहीद संदीप गायकर अमर रहे या घोषणाच ऐकू येत होत्या. संदीप यांचं पार्थिव गावात आणल्यानंतर हजारो लोकांनी गर्दी केली. त्यांना शेवटची मानवंदना देताना पत्नी दिपाली यांनी अभिमानाने सॅल्युट केलं. यावेळी त्यांचा दीड वर्षाचा मुलगा कडेवर होता. दिपाली यांनी पतीसाठी केलेलं कृत्य पाहून सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूच्या धारा लागल्या.