Sankarshan Karhade Fan Moment : कलाकार मंडळी म्हटलं की त्यांचा चाहतावर्ग हा आलाच. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी त्यांच्या कुटुंबासह वेळ घालवताना दिसतात त्यावेळी त्यांचे चाहते एका सेल्फीच्या आशेने त्यांना भेटण्याच्या आशेने त्यांच्याशी हात मिळवणी होईल म्हणून त्यांच्याजवळ येऊ पाहतात. मात्र, असे फार कमी चाहते आहेत जे या कलाकारांच्या कुटुंबाच्या वेळी त्यांना डिस्टर्ब होऊ नये असं म्हणत त्यांची इच्छा मारून त्यांच्यापासून अंतर राखून राहतात. असाच चाहत्यावर्गाचा एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने (Sankarshan Karhade) त्याची ही फॅन मोमेंट चाहत्यांसह शेअर केली आहे. कुटुंबासह दोन दिवस परदेशी गेलेल्या संकर्षणने चाहत्यांबरोबर आलेला उत्तम अनुभव अनुभवत तो अनुभव शेअर करत आनंदही व्यक्त केला आहे.
शूटिंगच्या वेळातून वेळ काढून संकर्षण त्याच्या कुटुंबाबरोबर बाहेरगावी फिरायला म्हणून गेला होता. कुटुंबाबरोबर वेळ घालवत असल्याने त्याच्या चाहत्यांनो त्यांना मध्ये येऊन डिस्टर्ब न करता थेट पत्र लिहून ते पत्र हॉटेल मालकाकडे दिले आणि ते त्यांच्या हातात सुपूर्त करायला सांगितले. संकर्षणने या गोड पत्राचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये या त्याच्या खास चाहत्याच भरभरून कौतुक केले आहे आणि आता संकर्षणलाच या चाहत्यांना भेटण्याची मनोमनी इच्छा असल्याचे सांगितले आहे. संकर्षणने पोस्ट शेअर करत त्याच्या या न भेटताच गेलेल्या चाहत्याला नाटकालाही आमंत्रित केले आहे त्यांच्यासह फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
चाहत्यांबाबत काय म्हणाला संकर्षण कऱ्हाडे?
संकर्षणने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “असे भारी आपले प्रेक्षक. दोन दिवस सुट्टी मिळाली म्हणून कुटुंबासोबत बाहेरगावी आलो आहे. एका टेबलवर जेवायला बसलो तर पलिकडच्या टेबलवर चार तरुण बसले होते. मराठी, मध्येच हिंदी, इंग्लिश सगळं बोलत होते. अधून मधून माझ्याकडे पाहत होते. मी त्यांनी मला ओळखलंय का नाही हा अंदाज बांधत होतो आणि खरंतर त्यांनी मला ओळखावं अशी मनांत अपेक्षाही करतच होतो. जेवण झालं आणि ते निघून गेले. मी निघतांना हाॅटेलच्या स्टाफने पत्रं आणून दिलं. जान्हवी आणि वेदांत यांनी अत्यंत सुंदर अक्षरांत त्यांचं म्हणन पत्रातून माझ्यापर्यंत पोचवलं”.
आणखी वाचा – पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”
पुढे त्याने म्हटलं, “मला त्या तरुणांच्या दोन्ही गोष्टींचं कौतुक वाटलं. पहिली – त्यांना मी कुटुंबाबरोबर आहे ही जाणीव पण होती आणि दुसरी – त्यांना व्यक्त व्हावं असंही वाटलं. क्या बात है. हे वाचुन आणि अनुभवून मीच त्यांचा फॅन झालो आणि आता मलाच रूखरूख लागून राहीली आहे की , मला त्यांच्याबरोबर फोटो काढायचा होता. तो राहीला. मित्रांनो अशा करतो की, ही पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. कधीतरी माझ्या नाटकाला या. मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे”. संकर्षणच्या या पोस्टला अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.