केवळ आठ महिन्याची लेक कडेवर घेत तिने मोठा हंबरडा फोडला. एकटक पतीकडे अभिमानाने पाहत होती. भावनांचे ढग दाटून आले. क्षणात आयुष्यभराच्या आठवणी डोळ्यासमोरुन फक्त घिरड्या घालत होत्या. काय काय वाटलं असेल त्या माऊलीला… जिने अवघ्या तिशीतच पतीला गमावलं. तेही पदरात चिमुकली लेक असताना… आठ महिन्यांची चिमुकली बाबाला तिरंग्याच्या सावलीत कायमचं शांत झोपलेलं पाहून जोरजोरात रडू लागली. लेकीला शांत करत तिने भरल्या डोळ्यांनी पतीला अभिमानाने शेवटचं सॅल्युट केलं अन् ते दृश्य पाहून हजारो उपस्थितांच्या अश्रूंचाही बांध फुटला. हजारो लोकांचा जनसमुदाय त्या एका आवाजाने क्षणात शांत झाला. हे हृदयपिळवटून टाकणारं चित्र शहीद सचिन वनंजे यांच्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण देशाने पाहिलं. युद्ध हवं, युद्ध हवं, युद्ध हवं असं सतत सोशल मीडियावर फक्त बोलणं सोपं मात्र प्रत्यक्षात त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याची काही अंशी जाणीव बहुदा अनेकांना झाली असावी. (operation sindoor soldier news)
वय होतं फक्त २९
‘सचिन वनंजे अमर रहे’, ‘सचिन वनंजे अमर रहे’ म्हणत हजारो लोकांच्या उपस्थितीत शहीद जवान सचिन वनंजे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. वय होतं फक्त २९… जवान सचिन वनंजे श्रीनगर येथे कर्तव्य बजावत होते. दरम्यान ६ मे रोजी झालेल्या अपघातात ते शहीद झाले. जम्मू-काश्मीर येथे प्रवास करत असताना लष्कराचे वाहन आठ हजार फूट खोल दरीत कोसळले. यावेळी सचिन यांचे सहकारीही त्यांच्याबरोबर होते. मात्र या अपघातात त्यांना वीरमरण आले. भारत-पाकमधील तणावाच्या वातावरणात ही संपूर्ण घटना घडली. त्यानंतर लगेचच सचिन यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं.
आठ महिन्यांची लेक कडेवर घेत…
९ मेला (शुक्रवारी) पहाटे सचिन वनंजे यांचं पार्थिव हैद्राबादमधून देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी पोहोचवण्यात आलं. यावेळी सचिन यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. फुलांनी सजवलेल्या वाहनात सचिन यांची अंत्ययात्रा सुरु झाली. यावेळी कुटुंबिय, पत्नी व त्यांची आठ महिन्यांची लेक यांची सुरु असलेली जीवाची घालमेल आयुष्यभर न विसरता येणारी ठरली. हजारोंच्या गर्दी मात्र सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांचा आक्रोश काळजाला घाव घालणारा होता.
पाहा व्हिडीओ
लग्नाच्या तीन वर्षांतच…
२०२२मध्ये सचिन वनंजे यांचं लग्न झालं होतं. अवघ्या तीन वर्षांमध्येच त्यांची सुखी संसाराची स्वप्न क्षणात थांबली. त्यांच्या पश्चात आठ महिन्यांची मुलगी, पत्नी, आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. ते २०१७मध्येच सैन्यात दाखल झाले. सैन्यात भरती होण्याची त्यांची जिद्द होती. याच जिद्दी व मेहनतीच्या जोरावर त्यांनी देशसेवा करण्याचं ठरवलं. त्याचप्रमाणे सचिन यांनी त्यांची देशसेवा सुरु ठेवली. सैन्यदलात प्रवेश केल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती सियाचिनमध्ये झाली. त्यानंतर जालंधर आणि आता श्रीनगरमध्ये ते देशसेवा करत होते. अखेरीस देशसेवा करत असतानाच सैन्याचं जिवंत वादळ कायमचं शांत झालं.