मराठीमध्ये सध्या नवनवीन चित्रपट येत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘देवमाणूस’. ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुक करण्यात आलं. महेश मांजरेकर व रेणुका शहाणे यांची जोडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता ‘देवमाणूस’ची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. त्यामागचं कारणंही तितकंच खास आहे. सई ताम्हणकर चित्रपटात लावणी करताना दिसणार आहे. सई पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर लावणी करणार आहे. ही लावणी सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आली आहे. काही तासांमध्ये सईच्या लावणीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. (sai tamhankar lavani)
‘आलेच मी’ म्हणत सईने सुंदर लावणी सादर केली आहे. ‘देवमाणूस’मध्ये तिची लावणी मुख्य आकर्षण ठरणार आहे. लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला हा चित्रपट बराच चर्चेत आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’मध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या मुख्य भूमिका आहेत.
आणखी वाचा – बाळाला जन्म दिल्यानंतरची स्त्री कोणाला कळलीच नाही, सावरलं तिने स्वतःला पण…
विविध भूमिका साकारत आपली छाप पाडणारी सई ‘आलेच मी’ या गाण्यातून एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. मराठीतील सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडेने ही लावणी गायली आहे. रोहन प्रधानने बेला शेंडेला लावणीमध्ये साथ दिली आहे. सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशीष पाटीलने या गाण्याची नृत्यरचना केली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर आशीषचं काम दिसून येतं.
आणखी वाचा – “‘छावा’ वाईट चित्रपट, सोयराबाई परपुरुषासमोर…”, आस्ताद काळेचं मोठं विधान, स्वतः चित्रपटात काम करुनही…
या लावणीसाठी सईने तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक वेळ सराव केला. लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली. सई म्हणाली, “’देवमाणूस’मध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. आशीषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती”. २५ एप्रिलला ‘देवमाणूस’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल.