आई होणं म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म. बाळ होण्यासाठी प्रयत्न करण्यापासून ते त्याचा संभाळ करण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हे. असंख्य वेदना, विचार त्यातही स्वतःला जपणं. इतकं करुनही बाळासाठी स्वतः खूश राहणं. म्हणजे किती किती ते कष्ट. हसतमुखाने आई म्हणून जगणं हे फक्त स्त्रीनेच करावं. आता आपण गरोदरपणानंतरचे त्रास याविषयी उघडपणे बोलतो. पण आपली आई जेव्हा तिचे अनुभव सांगते तेव्हा कुठे होते हे त्रास?, कोणी जपलं हो त्यांना… बाळाला जन्म दिल्यानंतर स्वतःनेच वेळ पडली तर घरात शेणही सारवलं आणि घराबाहेर पडून कामंही केली. पण आता बदलत्या काळानुसार आईपणही काहीसं बदलत चाललं आहे. शारीरिक त्रास वाढत आहेत. मराठी अभिनेत्रीनेच याविषयी मांडलेलं तिचं मत सविस्तर… (motherhood and problems during pregnancy )
अलिकडे सी-सेक्शनचं प्रमाण अधिक वाढलं आहे. आपल्या आजूबाजुलाही अशा कितीतरी आई सी-सेक्शनच्या अनुभवाबाबत सांगतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आताची लाइफस्टाइल याला कारणीभूत असावी वा शारिरीक त्रास. ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री मोनिका दाभाडेलाही सी-सेक्शनच करावं लागलं. पण त्यानंतर तिचं सुरु असलेलं आयुष्य याबाबत मोनिका उघडपणे बोलली आहे. मोनिकाने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – खरंच घरात कुत्रा पाळणं योग्य आहे का?, तुमचं नक्की काय चुकतंय?
आई झाल्यानंतरची व्यथा
मोनिका म्हणाली, “बाळाला आणि मला आई होऊन तब्बल एक महिना झाला. सी-सेक्शनमुळे पाठ, पोटाला होत असलेल्या वेदना, अपुरी झोप. कोणाचीही मदत न घेता स्वतः सगळं करण्याचा माझा अट्टाहास. आवडतं काम करता येत नाही म्हणून होणारी रडारड. हवं ते खात येत नसल्यामुळे जेवणाची इच्छा न होणे. असं बरंच काही होत असताना फक्त एक चेहरा आपल्याला सगळं विसरण्यास भूरळ घालू शकतो. यावर कधीही विश्वास नसलेली मी आणि माझी गोंडुबाई”.
बाप म्हणून जगताना…
आई झाल्यानंतर घरात राहून सगळं सांभाळणं आणि खरी परिस्थिती मोजक्याच शब्दांत मोनिकाने मांडली. आईबरोबरच बाबा होणंही सोपं नाही. बाळ जन्माला आल्यानंतर आईबरोबरच बाबाचीही तितकीच परीक्षा असते. मोनिकाचा पती चिन्मय कुलकर्णीने कवितेमधून तमाम बाब वर्गाची होणारी स्थिती मांडली.
बाप कसं व्हायचं माहित नसतं
बाप होण्याच्या प्रयत्नात थोडं जमतं
बरचसं फसतं
बाप कसं व्हायचं हे शिकावं आपल्या बापाला स्मरुन
नाहीच जमलं तर शिकवेल लेकरु
अक्षरशः तुमचं बोट धरुन
वरील कविता मोनिकाच्या नवऱ्याने लिहिली आहे. त्याच्या या कवितेला सोशल मीडियाद्वारे दाद मिळत आहे.