आपल्या स्पष्ट, बिनधास्त आणि बेधडक विचारांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. टीका, टोमणे सहन करुनही स्वरा आपल्या राजकीय आणि सामाजिक विषयांवरील वक्तव्ये करण्यापासून मागे हटत नाहीत. स्वरा भास्करने याआधी अनेकदा अनेक मुलाखतींमधून अनेक वक्तव्य केली आहेत, ज्यांची चर्चाही झाली आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत तिने खुलासा केला आहे की, राजकीय विचारांमुळे तिला चित्रपटसृष्टीने ब्लॅक लिस्टमध्ये टाकले होते. त्यामुळे तिच्या चित्रपटातील कारकिर्दीवर परिणाम झाला. स्वराने तिच्या करिअरमध्ये ‘तनु वेड्स मनू’, ‘अनारकली ऑफ आरा’ आणि ‘निल बट्टे सन्नाटा’ सारखे चित्रपट केले आहेत, ज्यात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. (swara bhaskar on bollywood film industry)
या चित्रपटांनंतर ती इतर काही चित्रपटांमध्येही दिसली, परंतु तिला सशक्त भूमिका मिळाल्या नाहीत. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत स्वरा म्हणाली की, “माझ्या राजकीय मतांमुळे मला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. आता ते नाकारण्यात अर्थ नाही. कारण हे अगदी स्पष्ट आहे. पण याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. मी एक मार्ग निवडला आणि मला माहित होते की, त्यासाठी मला किंमत मोजावी लागेल”.
यापुढे स्वरा भास्कर म्हणाली की, “मला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आल्याने खूप दु:ख झाले आहे, पण मला याचं आश्चर्य वाटले नाही. मला वाईट वाटले. दु:ख झाले. मला माझे काम आवडत होते आणि मला ते अजूनही आवडते. मी खूप सक्षम अभिनेत्री होते. आशा आहे की, मी अजूनही आहे. त्यामुळे ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाणे याबद्दल मी दुखावली. पण ते कोणत्या संदर्भात आहे हे मला समजले”.
आणखी वाचा – नेहा धुपिया व रिया चक्रवर्तीमध्ये भांडणं, एकमेकींसाठी वापरले अपशब्द, कॅमेऱ्यासमोरच घडलं असं की…
ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्याबद्दल स्वरा एकट्या बॉलिवूडला जबाबदार धरत नाही. याबद्दल ती म्हणाली की, “आपण आता अशा काळात राहतो, ज्या देशात प्रमुख शक्ती आणि सत्तेत असलेल्या लोकांनी नागरीकांच्या मतांशी असहमत असल्याबद्दल शिक्षा करणे हा मार्ग निवडला आहे. त्यांनी निर्णय घेतला आहे की, ते जनतेच्या असंतोषाला गुन्हा म्हणून घोषित करतील आणि जनतेच्या असंतोषाला ते देशविरोधी समजतील”.