सब टीव्हीवरील ‘बालवीर’ ही मालिका घराघरात लोकप्रिय होती. या मालिकेने लहान मुलांचे खूप मनोरंजन केले. भारताचा हा सुपरहिरो प्रेक्षकांना खूप भावला. या मालिकेत ‘बालवीर’ ही भूमिका अभिनेता देव जोशी याने साकारली होती. त्याने ‘बालवीर’ची भूमिका अजरामर करून ठेवली आहे. हा अभिनेता लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर देखील या अभिनेत्याचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. याच अभिनेत्याबद्दल एक आनंदी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अभिनेत्याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. देव जोशीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. यासोबत देवने होणारी पत्नी आरतीबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. (dev joshi engagement)
देवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देव आणि आरती एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत. तसंच यात देव त्याची साखरपुड्याची अंगठीदेखील दाखवत आहे. या व्हिडीओसह त्याने कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “प्रेम, हास्य आणि आयुष्यभराच्या अनेक आठवणीसह आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे”. याशिवाय अभिनेत्याने एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आरतीबरोबर पोज देताना दिसत आहे. देवने पांढऱ्या हुडीवर लाल शाल घेतली आहे. तर दोघांनी कपाळावर टिळाही लावला आहे. तर दोघांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळही दिसत आहे.
देवची होणारे पत्नी आरतीनेही रुद्राक्षाची जपमाळ व शाल पांघरून टिळा लावला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत. देव जोशीने लग्नाच्या तारखेबद्दल अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. परंतु असे दिसते आहे की, अभिनेता लवकरच लग्न करेल आणि त्याच्या जोडीदारासह आयुष्याचा नवीन प्रवास सुरु करेल. अभिनेता सध्या २४ वर्षांचा आहे आणि जुलै २०२४ मध्ये तो ‘बालवीर’मध्ये शेवटचा दिसला होता.
दरम्यान, देवच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘लकी’ या शोपासून त्याने सुरुवात केली. पण या शोमध्ये तो एका छोट्या भूमिकेत दिसला होता. यानंतर हिमा शनि देव की, हमारी देवरानी, काशी-अब ना रहे तेरा कर्ज कोरा और देवों के देव महादेव या शोमध्ये तो दिसला होता. पण त्याला २०१२ मध्ये खरी ओळख मिळाली. ‘बालवीर’ या शोमध्ये तो बालवीरच्या मुख्य भूमिकेत होता. त्याच्या या भूमिकेला खूप पसंती मिळाली. चाहत्यांनीही त्याच्या या शोला भरभरून प्रतिसाद दिला.