Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक दिवस झाले असले तरी आजही याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सासरच्या छळाला कंटाळत वैष्णवीने टोकाचं पाऊल उचललं. तिच्या आत्महत्येनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. राजकीय क्षेत्रातही याचे पडसाद उमटले. तर अनेक कलाकारांनीही याबाबत आपले मत मांडत संताप व्यक्त केला. हगवणे कुटुंब हे राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षातून वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे विधानसभा निवडणुकीत उभे राहिले होते. तर तिचा दीर, सुशील हगवणेदेखील राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर (Vaishnavi Hagawane Death Case) तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
राजेंद्र हगवणे यांच्याकडे पुण्यातलं मुळशी तालुक्याचं अध्यक्षपद होतं. तर लेक सुशील हगवणे युवक काँग्रेसचा पदाधिकारी होता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर सुशील हगवणेची एक सोशल मिडिया पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याने लेकींबाबत आणि सूनेबाबत भाष्य केलं आहे. सुशीलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असताना सुशील हगवणे याने मागच्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा प्रचार केला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवली होती. बारामतीत नणंद विरूध्द भावजय अशी लढत झाली होती. त्यावेळी सुशील हगवणे हा सुनेत्रा पवारांचा प्रचार करत होता. त्यावेळी त्यानं सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी इन्स्टाग्रामवरती शेअर केलेली पोस्ट आता चर्चेत आली आहे. “यावेळी लेकीला नाही तर सूनेला निवडून आणुया. सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारु शकतात, सूनासुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया. एक मत सूनेसाठी”, अशी पोस्ट सुशील हगवणे याने केली होती.
सूनेबाबत सुशीलने केलेल्या या पोस्टवरुन त्याला त्याच्या घरच्या सूनांची आठवण झाली नसेल का?, हा प्रश्न सतावत आहे. हगवणेंच्या मोठ्या सूनेने योग्य तो निर्णय घेत वेळीच घरातून काढता पाय घेतला तर धाकट्या सूनेने असह्य झालेला छळ पाहता थेट आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. या दोन्ही सूनांचा हागवणेंनी विचार केला नसेल. सूनांच्या बाजूने पोस्ट करणाऱ्या सुशीलचे भावजयला मारताना हात धजावले नसतील का?, असे अनेक प्रश्न या पोस्टनंतर व्हायरल झाले आहेत.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी, मोठी रक्कम आणि दागिने लंपास, बहिणीच्या लग्नाची सुरु होती तयारी अन्…
“लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण”, “निर्लज्ज राजकारणी, सहआरोपी करा यांनापण सूनेबद्दल कोण बोलतंय बघा”, “राजकारणात माणसं किती खोटं बोलतात बघा, स्वत:च्या घरातील सूनांना नीट सांभाळायचं आणि इज्जत द्यायचं कळत नाही तुम्हाला आणि इथे लोकांना ज्ञान शिकवतो का, तू वागलास काय आणि इथे बोलतोस काय, तुम्हाला खूप कळत सूनेचा मान कसा ठेवायचा”, “अख्खा महाराष्ट्र बघतोय काय तुमची काय लायकी आहे ते”, अशा अनेक कमेंट करत सुशील हगवणेला धारेवर धरलं आहे.