वैष्णवी हगवणेने अवघ्या विशीमध्ये प्रेमापोटी स्वतःचा जीव गमावला. पती शशांक हगवणेवर प्रेम केलं आणि कुटुंबिय तयार नसतानाही तिने त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. शेवटी वडिलांची मायाही तिच्या हट्टापुढेही हरली. लेकीचं लग्न लावून द्यायचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी ५१ तोळे सोनं, एक फॉर्च्युनर गाडी आणि इतर महागड्या वस्तू हुंड्याच्या स्वरुपात दिल्या. तरीही पैशांच्या हव्यासापोटी हगवणे कुटुंबिय कस्पटेंकडे पैशांची मागणी करतच राहिले. त्याचबरोबरीने वैष्णवीला मानसिक, शारीरिक छळालाही सामोर जावं लागलं. याच सगळ्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली. मात्र वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. तब्बल २९ व्रण, पाच-सहा ताज्या जखमा दिसून आल्या. हिच वैष्णवी तिच्या लग्नात किती सुखी होती? याचाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. (Vaishnavi Hagawane Marathi Ukhana Video)
वैष्णवी शशांकवर जीवा पाड प्रेम करत होती हे तिच्या लग्नातील व्हिडीओंमधून दिसून येतं. तिने लग्नात नवऱ्यासाठी घेतलेला उखाणाही व्हायरल होत आहे. लग्नासाठी वैष्णवी सुंदर नटली होती. यावेळी तिने अगदी खास उखाणा घेतला. ती म्हणालेली, “चंदेरी थाळी, सोनेरी बटण, शशांकरावांना आवडतं चिकन आणि मटण”. उखाणा घेताच ती लाजली असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
वैष्णवीचा हा उखाणा सध्या सगळीकडे वेगाने व्हायरल झाला आहे. त्याचबरोबरीने तिच्या लग्नातील एक व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये संपूर्ण राजेशाही थाट दिसतोय. इतकंच नव्हे तर वैष्णवी लग्नात रडतानाही दिसली. भरमंडपात लग्नाच्या विधी सुरु असताना शशांक तिला भांगेत कुंकू भरतो. यावेळी वैष्णवीला अश्रू अनावर होतात. ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण सत्यात उतरला याचा आनंद तिच्या डोळ्यांमध्ये तेव्हा दिसत होता.
आणखी वाचा : २९ जखमा, पाच-सहा वार ताजेच अन्…; वैष्णवी हगवणे प्रकरणातील मोठी माहिती, शेवटच्या श्वासापर्यंत वार आणि…
वैष्णवीने सुखी संसाराची हजारो स्वप्नं पाहिली होती. मात्र पोरीच्या नशिबी काहीतरी भलतंच आलं. लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च वैष्णवीच्या वडिलांनी केला. ५२ लाख रुपयांचं जेवणच होतं. स्टेजसाठी २२ लाख रुपये खर्च केले. हगवणे कुटुंबियांच्या मागणीप्रमाणे वैष्णवीच्या वडिलांना सारं सारं काही केलं. हुंडाही देऊ केला. मात्र पैशांच्या हव्यासामध्ये बुडालेलं हगवणे कुटुंबियांच्या मागण्या काही केल्या संपल्या नाहीत. अखेरीस कस्पटे कुटुंबियांनी सोन्यासारखी लेक गमावली.