सध्या देशभरात मुकेश अंबानीच्या लेकाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अनंत व राधिका लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींचीही सर्वत्र चर्चा सुरु आहे. संगीत, हळद हे लग्नापूर्वीचे कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमांना राजकीय नेत्यांपासून ते बॉलीवूड कलाकारांपर्यंत तसेच अनेक सेलिब्रिटी यांनी उपस्थिती दर्शवित कार्यक्रमाची शोभा वाढविली. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाला जवळचे नातेवाईक मंडळी, मित्रमंडळीही उपस्थित होते. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात अनेकांचा हटके नृत्याविष्कार पाहायला मिळाला. (Tejas Thackeray Dance On Anant ambani wedding)
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या नृत्यानेही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला तेजस ठाकरे याने ठेका धरलेला पाहायला मिळाला. तेजस ठाकरे यांचा तुफान व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेजस ठाकरेला अंबानींच्या कार्यक्रमात नाचताना पाहून सत्ताधाऱ्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. तेजसच्या नृत्यानंतर हा डान्स राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
अनंत व राधिकाच्या संगीत सोहळयाला तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांची उपस्थिती होती. याआधी ही अंबानी यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबाला आमंत्रित करण्यात आले आणि ठाकरे परिवाराने अंबानी यांच्या आमंत्रणाचा मान राखत उपस्थितीही लावली. अशातच अनंत व राधिकाच्या संगीत सोहळ्याला तेजस ठाकरेने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘लड़की, हाए, अल्लाह’ या गाण्यावर ठेका धरला. सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारियाही तेजस ठाकरेबरोबर या गाण्यावर मंचावर थिरकताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तेजस ठाकरेचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
तेजस ठाकरे याच्या नृत्याने आता राजकीय वर्तुळात पेट घेतला आहे. भाजप आमदार नीतेश राणे यांनी तेजस ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नितीश राणे यांनी टीका करत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. तेजसचा हा डान्स पाहून ते असे म्हणाले की, ” ‘अनंत अंबानीच्या लग्नात नाचणाऱ्या तेजस ठाकरेला आता नाच्या ठाकरे नाव द्यावं”.