Shruti Atre Shared Goodnews : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीने चाहत्यांना आई झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. मातृदिनानिमित्त अभिनेत्रीने आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आणि त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत अभिनेत्रीने आई झाल्याचा सुखद धक्का दिला. अभिनेत्री श्रुती अत्रे हिला मुलगा झाला असून तिने ही आनंदाची सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली आहे. लेकाच्या येण्याने श्रुती आणि तिचा नवरा अश्विन खूप खुश आहेत. सोशल मीडियावर आई होताच अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. श्रुती सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे.
“१२-०५-२०२५. आपलं कुटुंब खऱ्या अर्थाने मोठं झालं आणि आधीपेक्षा जरा जास्त हँडसम झालंय. बेबी बॉय”, असं कॅप्शन देत श्रुतीने गोंडस बाळाला जन्म दिल्याची आनंदाची बातमी दिली. श्रुतीच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि कलाकार मंडळी शुभेच्छा देताना दिसत आहेत. २०१९ मध्ये श्रुतीने अश्विनबरोबर लग्न केलं. आणि लग्नाच्या सहा वर्षांनी त्यांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. आता श्रुती व अश्विन पालक झाले असून ते खूप खुश आहेत. नुकतीच श्रुतीने आई होणार असल्याची गोड बातमी मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो पोस्ट करत दिली.
आणखी वाचा – बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका घराघरांत प्रसिद्ध झाली. या मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वतःची अशी ओळख निर्माण करत रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या मालिकेमुळे श्रुतीला विशेष लोकप्रियता मिळाली. श्रुतीने या मालिकेत राजश्री ढाले पाटील ही भूमिका साकारली होती. श्रुतीचे हे खलनायिकेचे पात्र नेहमीच चर्चेत राहिलेलं पाहायला मिळालं. या पात्रामुळे तिला विशेष ओळख मिळाली. याशिवाय श्रुतीने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली पाहायला मिळाली.
“यंदाचा मातृदिन माझ्यासाठी वेगळा आहे. आमचं कुटुंब आता मोठं होणार आहे आणि ही गोड बातमी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा प्रवास सोपा नव्हता… या प्रवासात प्रचंड अडचणी आल्या, काही भीतीचे क्षण होते. पण, या सगळ्यात आमच्याबरोबर तुम्हा सर्वांचं प्रेम कायम होतं. प्रत्येक आईला आणि लवकरच आई होणाऱ्या प्रत्येक महिलेला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एक नवीन सुरुवात मातृत्व, मदर्स डे स्बेशल” अशा भावना आणि आई होणार असल्याची गुडन्यूज श्रुतीने पोस्ट शेअर करत दिली. श्रुतीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.