Nayna Apte Incident : सिनेसृष्टीत काम करत असताना बरेचदा कलाकार मंडळींना त्यांच्या मनासारखं काम मिळत नाही. वा मिळालं तर त्यात काही ना काही कमी ही असतेच. कित्येकदा तर कलाकार मंडळी आर्थिक परिस्थिती ढासळू नये म्हणून त्यांच्या मनासारखं नसलेलं काम करतात, यांत विशेषतः महिला कलाकारांचा अधिक समावेश आहे. महिला कलाकारांना मनाजोगे काम न मिळाल्याने अनेक अटींचा सामना करावा लागतो. काही महिला या अटी नाकारत स्पष्ट नकार देतात, तर काही महिला नाईलाज म्हणून सर्व अटी मान्य करत निमूटपणे सहन करतात. अशाच एका अभिनेत्रीने बिकिनी घालणार नाही म्हणून बॉलिवूड चित्रपटात काम करण्याचे नाकारले. या अभिनेत्री म्हणजे नयना आपटे.
एका हिंदी चित्रपटासाठी बिकिनी घालण्यास नकार देण्यावरुन नयना यांनी ‘ठाकुर विचारणार’ शोमध्ये भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “रामानंद सागर यांनी मला धर्मेंद्र-हेमा मालिनी यांच्या ‘चरस’ चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. कारण त्याच सेटच्या शेजारी माझं चित्रीकरण सुरु होतं. तेव्हा माझ्याबद्दल विचारताना ही कोण मुलगी आहे? असं रामानंद सागर म्हणाले. तर शांता आपटेंची ही मुलगी आहे असं एकाने सांगितलं. तेव्हा रामानंद सागर यांनी मला बोलावून घेतलं. मी त्यांना भेटायला गेले. तेव्हा ते मला म्हणाले, मी चित्रपट करत आहे. ‘चरस’ चित्रपट आहे ज्यामध्ये धर्मेंद्र व हेमा मालिनी असतील. पण तुझी भूमिका नकारात्मक आहे. त्यासाठी तुला बिकिनी घालावी लागेल पण भूमिका चांगली आहे असं त्यांनी मला सांगितलं”.
पुढे त्या म्हणाल्या, “मी त्यांना म्हटलं सागर साहेब मला त्यामध्ये विचित्र वाटेल. मी त्या ड्रेसमध्ये मला अवघडल्यासारखं होईल. स्विमसूट मला द्या मी तो घालेन. बिकिनी घातली तर मी काम करु शकत नाही. मला जर चांगलं काम करायचं आहे तर मी ज्या ड्रेसमध्ये योग्य असेन तेच मला द्या. तर ते मला बोलले की, बिकिनी ही भूमिकेची गरज आहे. तर मी बोलली माफ करा हे होणार नाही. तू असं करणार तर इंडस्ट्रीमध्ये तुला काम कोण देणार? असंही ते मला म्हणाले”.
पुढे नयना आपटे असंही म्हणाल्या की, “असं असेल तर इंडस्ट्रीमध्ये मला काम नको. असं करुनच मला काम मिळवायचं नाही. मला चांगलं काम करुन पुढे जायचं आहे असं माझं उत्तर होतं. मी नाही बोलले त्यावेळी याचं मला आजवरही दुःख नाही”. आज नयना आपटे यांनी कलेच्या जोरावर सिनेविश्वात स्वतःचे नाव कमावले आहे.