Crime Latest News : भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थतीचा तणाव, पुन्हा करोनाचा संपर्क या सगळ्या जगात घडणाऱ्या मोठ्या घडामोडींमध्ये अत्याचार, लैंगिक शोषणाच्या बातम्या कानाला त्रासदायक ठरत आहेत. दररोज नेहमीच कानावर येणाऱ्या या अत्याचार, लैंगिक शोषणाच्या, बलात्काराच्या बातम्यांमधील एका बातमीने पायाखालची जमीन सरकली. हो. माय-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही बातमी आहे. स्वतःच्याच घरात चिमुरडीवर केलेला लैंगिक अत्याचार त्या मायेला बघवला तरी कसा, असे अनेक प्रश्न सतत भंडावून सोडत आहे. मुंबईतील मालवणी परिसर येथे घडलेली ही दुर्दैवी घटना साऱ्यांना धक्का देणारी आहे. डोळ्यादेखत आपल्या लेकीचा तडफडून झालेला मृत्यू त्या आईला तरी पाहावला असेल का?.
मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी मालवणी पोलिसांनी महिलेसह तिच्या १९ वर्षीय बॉयफ्रेंडला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय महिला गर्भवती असताना तिचा पती तिला सोडून गेला. आणि त्यांनतर तीन वर्षांपूर्वी तिने नवऱ्याला घटस्फोट देखील दिला. १८ मे रोजी रात्री आरोपी तरुणाने महिलेच्या डोळ्यासमोरच तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. चिमुकल्या मुलीला प्रचंड वेदना होत होत्या. ती जोरजोरात रडत होती. या त्रासातच चिमुकलीचा मृत्यू झाला.
त्यानंतर आरोपी महिलेने आपल्या मुलीला मालवणी येथील रुग्णालयात नेले. त्याठिकाणी तिने डॉक्टरांना खोटं सांगितले की, तिची मुलगी अपस्माराने ग्रस्त आहे. पण डॉक्टरांनी चिमुकलीची तपासणी केली असता मृत घोषित केले. या तपासणीदरम्यान त्या चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळून आल्या आणि हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर पॉस्कोअंतर्गत त्या आईवर आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आले आहे.
बापापासून दूर राहिलेल्या त्या अडीच वर्षाच्या मुलीला आईने स्वतःच्या डोळ्यासमोरच संपवलं. प्रेम संबंधामुळे तिने पोटच्या लेकीचा जीव घेतला. प्रियकराला न थांबवता त्याच्या वाईट कृत्याला दुजोरा देत अडीच वर्षीय मुलीला संपवलं. यातून एक आई म्हणून तिला काय मिळालं? हा प्रश्न कायम असेल. आई-मुलीच्या नात्याला गालबोट लागेल असं एक उदाहरण देत तिने या नात्याचा घोर अपमान केला.