Kavita lad Medhekar On Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. कोल्हापूरची रांगडी भाषा हाताळत ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली. या मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वतःची अशी ओळख निर्माण केली. आज ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेतील अधिपती-अक्षरा या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. तर मालिकेत भुवनेश्वरी या पात्राने अगदी पहिल्या दिवसापासून तिच्या अभिनयाने वेड केलं. हे पात्र अभिनेत्री कविता मेढेकर-लाड (Kavita Medhekar-Lad) साकारत आहेत. जवर विविध मालिकांमधून सोशिक, सोज्ज्वळ भूमिका साकारणाऱ्या कविता यांनी या मालिकेत खलनायकी पात्र साकारत चाकोरी बाहेरील भूमिका साकारली.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून त्यांचं वेगळंच रुप बघायला मिळालं. वेगळ्या धाटणीची भूमिका साकारत त्यांनी स्वतःला छोट्या पडद्यावर मोठं केलं. आजवर विविध नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली आहेच त्यानंतर मालिकेद्वारे खलनायिकी पात्र साकारत त्यांनी स्वतःलाच दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं. त्यांची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणारा आहे. बरीच वर्ष सुरु असलेली ही मालिका काही दिवसांत संपणार असल्याचं स्वतः कविता यांनी शेअर केलं आहे.
मालिकेबाबत कविता मेढेकर-लाड काय म्हणाल्या?
कविता मेढेकर-लाड यांनी महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मालिका लवकरच निरोप घेण्याबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “मालिका संपल्यावर दोन-सव्वादोन वर्षांनी मिळणाऱ्या निवांत वेळेचा सदुपयोग करण्याकडे त्या अधिक लक्ष देणार आहेत. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे ७५०हून अधिक प्रयोग झाले आणि हे प्रयोग यापुढेही सुरु राहणार आहेत. अजून एखादं नाटक करायला त्यांना विशेष आवडेल. माध्यमांपेक्षा कंटेंट त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे आव्हानात्मक भूमिकेसाठी विचारणा झाली, तर कोणत्याही माध्यमात काम करायला त्यांना आवडेल”, असं त्यांनी म्हटलं.
कविता मेढेकर-लाड यांनी मालिकेत साकारलेली भुवनेश्वरी, हृषीकेश शेलारने साकारलेली अधिपती ही भूमिका आणि शिवानी रांगोळेची अक्षरा ही भूमिका लवकरच मालिकेचा निरोप घेणार आहेत. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकवर्गात याची नाराजी पाहायला मिळेल. मालिका केव्हापासून ऑफ एअर जाणार याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.