झगमगत्या विश्वातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कास्टिंग काउच. पूर्वी अभिनेत्री त्यांच्याबरोबर घडणाऱ्या प्रसंगांबद्दल कुठे बोलत नव्हत्या. पण आता अभिनेत्री पुढे येतात आणि त्यांच्याबरोबर घडलेल्या घटना-प्रसंगे सांगतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क करण्यासाठी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शक, निर्माते यांच्या ऑफरला नकार देत चित्रपटात काम करणं टाळलं आहे. बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वातही अशा घटनांबद्दलच्या अनेक चर्चा ऐकायला मिळतात. अशातच अभिनेत्री अश्विनी भावे यांनीही त्यांच्याबरोबरच्या कास्टिंग काउचबद्दलच्या प्रकाराबद्दल भाष्य केलं आहे.
आपल्या मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अनेक मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे. ‘शाब्बास सूनबाई’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘वजीर’ ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘ध्यानीमणी’सारख्या अनेक मराठी व ‘जखमी दिल’, ‘मोहब्बत की आरजू’, ‘बंधन’सारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंबजन केलं आहे. अशातच त्यांनी नुकतीच आरपारला मुलाखत दिली. यात त्यांनी कास्टिंग काउचबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – श्रावण महिन्याची प्रेक्षकांना खास भेट, ‘जय भोले’ गाणं सर्वत्र प्रदर्शित, तुम्ही पाहिलंत का?
याबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “मी एकदा एका मोठ्या कलाकाराच्या सेक्रीटरीला भेटायला गेले होते. चित्रपटाच्या बांधणीमध्ये ते सहभागी होते. तर त्यांनी मला बोलावलं आणि ऐकूनच मला लक्षात आलं होतं की, कदाचित हे कास्टिंग काउचच्या दिशेने जाऊ शकते. तर मी सुज्ञ आहे. माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती. मला माहीत होतं एका मर्यादेपर्यंत गेलं तर दोन झापडात (कानाखाली) मारायला पण मी कमी करणार नाही. करावच लागतं ते”.
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “तुम्हाला स्वतःचं संरक्षण करावंचं लागतं आणि मी माझी एक प्रतिमा बनवून ठेवली होती, जी माझ्या खूप कामाला आली. लोक मला घाबरतातच, म्हणजे लोक धजावतचं नाहीत. एका मर्यादेनंतर हे नाही करायचं”. दरम्यान, अश्विनी यांचा घरत गणपती नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे व मराठमोळ्या लुकचे सर्वत्र कौतुक होत आहे.