सामान्य माणसू असो किंवा कलाकार असो प्रत्येकजण विविध विषयावर आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करत असतो. सध्या सर्वत्र चर्चा असलेल्या अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याबद्दलही एका मराठी कलाकाराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबातील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडींग सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. या सोहळ्याची जगभरात चर्चा रंगली. आता अंबानी कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिमाखदार प्री-वेडींग सोहळ्यानंतर आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याची. जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबर ते बॉलीवूडमधील भाईजान सलमान खान यांच्या डान्स परफॉर्मन्सने हा सोहळा चांगलाच गाजला. (saurabh gokhale on anant ambani wedding)
या सोहळ्यावर मराठमोळा कलाकार सौरभ गोखलेने मात्र मिश्किल टिपण्णी करत अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत सौरभ म्हणाला, “आज एका धनाढ्य कुटंबातील लग्नसमारंभातील कुटुंबीयांचा नृत्याविष्कार पाहून मला माझ्या छोट्या नुमवि शाळेतील स्नेहसंमेलातील आमचा नाच आठवला. फरक इतकाच की, आम्ही ‘विद्यार्थी’ होतो आणि त्यांना ‘अर्थ-विद्या’ उत्तम येते”. अंबानी कुटुंबाच्या या संगीत सोहळ्याला रितेश-जिनिलियासह माधुरी दीक्षितनेदेखील उपस्थिती दर्शवली होती. कलाकारांसह नुकत्याच वर्ल्ड कप जिंकून आलेल्या भारतीय संघातील खेळाडूनेदेखील या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती.

हे देखील वाचा- Video : संगीत सोहळ्यामध्ये सलमान खानबरोबर बेभान होऊन नाचला अंनत अंबानी, उपस्थितही बघत बसले अन्…; व्हिडीओ व्हायरल
सलमान खानच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटातील आणि सोनू निगम यांनी गायलेल्या ‘ऐसा पेहली बार हुआ है’ या गाण्यावर सलमान खान आणि अनंत अंबानी थिरकताना पाहायला मिळाले. या व्हिडिओवर सलमान खानच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत आपली पसंती दर्शवली. अनंत-राधिकाच्या लग्नात नक्की कोण कोण हजेरी लावणार? आणि हा सोहळा नक्की कसा पार पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर या लग्नसोहळ्यास मनोरंजन, क्रीडा तसेच राजकीय क्षेत्रातील कोण कोणते चेहरे उपस्थित राहणार? हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. हा विवाह सोहळा अंबानी कुटुंबाच्या अँटिलिया या निवासस्थानी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान लग्नसोहळ्यानंतर १३ जुलै रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत अन्य विधी पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अनंत-राधिका यांचा रिसेप्शन सोहळा १४ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.