Parth Ghatge Jay Bhim VIdeo : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती देशभरात अगदी जल्लोषात साजरी करण्यात आली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. या सगळ्यात एका व्हिडीओने साऱ्यांचे अधिक लक्ष वेधले. ‘तुम्ही जय भीम वाले का?’, असं म्हणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर हा व्हिडीओ आहे मालिकाविश्वातील अभिनेता पार्थ घाटगे याचा. पार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि या व्हिडीओमधून ‘तुम्ही ‘जय भीम’ वाले का?’, त्याने असं विचारणाऱ्याला थेट उत्तर देत त्यांची तोंड बंद केली आहे. पार्थचा हा व्हिडीओ पाहून त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.
व्हिडीओ शेअर करत पार्थ घाटगे काय म्हणाला?
व्हिडीओ शेअर करत पार्थ म्हणाला, ‘तुम्ही ‘जय भीम’ वाले का?’. प्रिय बाबासाहेब, मागच्या वर्षी तुमच्या जयंतीनिमित्त तुम्हाला अभिवादन करण्यासाठी मी स्टेटस ठेवलं होतं तेव्हा अनेक लोकांनी मला विचारलं ‘तुम्ही ‘जय भीम’ वाले का?’. तुम्हाला, तुमच्या विचारांना, तुमच्या आभाळाएवढ्या कार्याला एका जातीपुरतं संकोचीत करुन ठेवलंय, हे बघितल्यावर खूप वाईट वाटलं हो. बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलंय, हा प्रश्न विचारणाऱ्या लोकांमध्ये मी देखील होतो. माझ्या जातीचा भयंकर माज होता मला. अय…वरच्या जातीत जन्माला आलोय याची एक वेगळीच उर्मी होती. मग तुम्ही लिहिलेलं Annihilation of caste हे पुस्तक वाचलं आणि एक जोरदार चपराक बसली”.
आणखी वाचा – कॅटी पेरीप्रमाणे तुम्हीही अंतराळात जाऊ शकता?, ११ मिनिटांती ती फिरुन आली अंतराळ, एकूण खर्च आहे…
पुढे त्याने म्हटलं आहे, “जात नावाचं पिढ्यानपिढ्या पोसलेलं ओझं उतरवलं गेलं. मी स्वत:ला विचारलं, एखाद्या जातीत मी जन्माला आलो यात माझं काय कर्तृत्व आहे? मग ज्या गोष्टीत माझं काही कर्तृत्वच नसेल तर, त्याबद्दल माज, अभिमान बाळगण्याचा मला काय अधिकार आहे. मी स्वत:ला आणि इतरांना आडनावाच्या पलिकडे जाऊन ओळखायचा प्रयत्न केला. त्यानंतर मी हिंदू कोड मिलबद्दल वाचलं. आज माझी आई, बहिण जर हिंदू समाजात जर आत्मसन्मानं जगत असतील तर त्यामागं तुम्ही दिलेला लढा आहे. हिंदू स्त्रियांच्या हक्कासाठी तुम्ही राजिनामा द्यायलासुद्धा तयार झाला होतात. आज कोणत्याही धर्मातील कामगार स्त्री जेव्हा मॅटर्निटी लीव्ह हा हक्क बजावते तेव्हा या हक्कामागे तुम्ही पाठीशी होतात हे विसरता कामा नये”.
आणखी वाचा – बाळाला जन्म दिल्यानंतरची स्त्री कोणाला कळलीच नाही, सावरलं तिने स्वतःला पण…
यापुढे त्याने असंही म्हटलं आहे की, “खरंतर बाबासाहेब मी कागदोपत्री वरच्या जातीत जन्माला आलोय खरा पण वरच्या जातीतील लोकांनी केलेल्या अन्यायाची, क्रूरतेची मला पूर्णपणे जाणीव आहे. तो अन्यायाचा क्रुर सैतानी वारसा माझ्यापर्यंत आला नाही मी माणूस राहिलो कारण ती साखळी तोडायला तुम्ही होतात. बाबासाहेब, आज तुमच्यामुळे माझ्यातलं माणूसपण आहे. आणि आज मी बाबासाहेब तुम्हाला वचन देतो ही जातियवादाची कीड मी माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहचूदेखील देणार नाही”.