Odisha Women Murdered : ‘आई’ हा शब्द इतका नाजूक आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे की, यापुढे जगातील आणखी इतर कोणतीही गोष्ट असू शकत नाही. नऊ महिने पोटात वाढवून त्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून संगोपनात लागलेली ही आई कधीच दमत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ही आई आपल्या मुलांचं जमेल तसे करत असते. बरेचदा मुलांकडून वाईट वागणूक मिळूनही तिची माया काही कमी होत नाही. तर काहीवेळा आईच काळीज नसणाऱ्या महिला त्यांच्या बाळाला रस्त्याच्या कडेला, कचऱ्याच्या डब्यात सोडून जातात. यांत मुलींचं प्रमाण अधिक आहे. वंशाचा दिवा हवा हा अट्टाहास असणाऱ्या महिलांच्या डोक्यात हे विचार सतावतात. असं असलं तरी, शेवटी एक आईच त्या बाळाला पोटाशी घेत स्वतःच बाळ समजून जीवापाड जपते. लहानाचं मोठं करते, हो अशी अनेक उदाहरण आहेत ज्यात रस्त्यालगत पडलेल्या चिमुकल्या जीवाला आपल्या पदराखाली घेत लहानाचं मोठं केलं. मात्र याचं त्या मुलांकडून मिळालेलं फळ काय असावं मृत्यू?.
हो. नुकतीच घडलेली घटना. १३ वर्षीय मुलीने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने आईची हत्या केली. पोटची मुलगी नाही तर तीन महिन्याची असताना नकोशी झालेल्या आई-वडिलांना रस्त्यावर सोडून दिलेलं ते बाळ एका जोडप्याने घरी आणलं आणत त्याचे संगोपन केले, लहानाचं मोठं केलं आणि शेवटी झालं काय?, तर त्या बाळाला पंख फुटले. वयाच्या १३ व्या वर्षी आईला मारून टाकावे असे मनात तरी कसे येऊ शकते?. जन्मदात्री आई नसली म्हणून काय झालं, तीन महिन्याच्या त्या बाळाला तेरा वर्षाची होईपर्यंत हातावरच्या तळफोडाप्रमाणे जपलं ही त्या मृत आईची चूक का?.
ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी शहरात घडलेली ही घटना. दत्तक घेतलेल्या १३ वर्षीय मुलीने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने आईचा खून केला. ऐकायला किती त्रासदायक वाटत असलं तरी हेच सत्य आहे. दत्तक मुलगी तिच्या आईसह भाड्याच्या घरात राहत होते. मुलगी दत्तक घेतल्यानंतर एका वर्षातच वडील गेले. आणि त्यानंतर त्या एकट्या आईने १२ वर्ष मुलीला सांभाळलं. मात्र, जेव्हा आईला मुलीच्या प्रेमप्रकरणाबाबत संशय आला तेव्हा मुलीनेच प्रियकराच्या साथीने आईच्या मृत्यूचा कट रचला. आईला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर उशीने दोघांनी मिळून तिचा जीव घेतला. यावर न थांबता तिघे त्या मृत व्यक्तीला घेऊन हॉस्पिटलला पोहोचले आणि हार्ट अटॅक आल्याचं खोटे बोलले. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर त्या तिघांनी मृत आईवर अंत्यसंस्कारही केले.
मृत व्यक्त राजलक्ष्मी यांच्या भावाने हा प्रकार समोर आणला. बहिणीच्या मृत्यूनंतर आलेल्या भावाने त्या आरोपी मुलीचा मोबाईल तपासला. तेव्हा त्याच्या हाती आरोपी मुलीचे प्रियकराबरोबरचे इंस्टाग्राम चॅट लागले. यावर राजलक्ष्मी यांच्या हत्येबरोबरच सोन्याच्या वस्तू आणि ६०००० रोख रक्कम चोरीचाही उल्लेख होता. त्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेत त्या आरोपी मुलीची तक्रार नोंदविण्यात आली असून तिच्यासह प्रियकर आणि त्याच्या मित्रालाही ताब्यात घेतले आहे.