‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये दमदार स्पर्धकांची एण्ट्री पाहायला मिळत आहे. यंदाच्या या नव्या पर्वाचे सुंत्रसंचालन रितेश देशमुख करणार आहे. १६ स्पर्धकांची शाळा घेताना रितेशला पाहणंही रंजक ठरणार आहे. या पर्वाच्या पहिल्या स्पर्धक म्हणून अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी एण्ट्री घेतली. गेल्या काही दिवसांपासून वर्षा यांच्या नावाची चर्चा सुरु होती. पण त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात येणार नसल्याचं म्हटलं. मात्र अचानक त्यांची एण्ट्री पाहून साऱ्यांना धक्का बसला आहे. (Varsha Usgaonkar and Ankita Walavalkar)
वर्षा यांच्या एण्ट्रीनंतर ‘बिग बॉस’च्या घरात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरची एण्ट्री झाली. ‘बिग बॉस’च्या घरात पाऊल ठेवताच अंकिताची एक चूक साऱ्यांनी हेरली. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना संपूर्ण जग ओळखतं. एक काळ वर्षा यांनी खूप गाजवला. चित्रपट, मालिकांमधून वर्षा यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात येताच वर्षा यांना पाहून अंकिताने त्यांचं चुकीचं नाव घेतलं. हे पाहून साऱ्यांना धक्का बसला.
अंकिता वालावलकर हिने अभिनेता निखिल दामले याच्यासह घरात एण्ट्री घेतली. या भेटीत अंकिता वालावलकर हिनं वर्षा उसगांवकर यांचं नाव ‘आजगावकर’ असं घेतलं. यावर वर्षा “ओह आजगांवकर आता”, असं बोलताना दिसत आहेत. त्यामुळं इतक्या मोठ्या अभिनेत्रीचं नाव चुकवल्यानं कोकण हार्टेड गर्लला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. मात्र यावेळी अंकिताने लगेचच त्यांची माफी मागितली. सॉरी उसगांवकर असं म्हणत तिने चुकलेलं नाव परत घेतलं. आल्या आल्या अंकिताने वर्षा यांच्या पाया पडून आशीर्वादही घेतला.
‘बिग बॉस’च्या घरात नेते, अभिनेते यांसह रीलस्टार, कीर्तनकार सहभागी झाले आहेत. वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी एण्ट्री घेतली आहे.