Bigg Boss Marathi 5 : सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व चांगलेच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक तसेच त्यांच्यामध्ये सुरु असलेले वाद व भांडणं यामुळे नवीन पर्वाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतंच झालेल्या ‘बिग बॉस’च्या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. कोणाचे काय चुकले? आणि कोणी काय करायला हवे? या सर्व गोष्टी रितेशने सांगितल्या. दर आठवड्याच्या रविवारी एलिमेशन पार पडते आणि या पर्वाचे दुसरे एलिमिनेशन आज पार पडले असून यात एलिमिनेशनमध्ये निखिल दामले हा स्पर्धक घराबाहेर पडला आहे. नवीन पर्वातील तीन आठवड्यानंतर निखिल घराबाहेर पडला आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
या आठवड्यात योगिता, निखिल, सूरज व अभिजीत सावंत हे चार सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. अरबाज व अभिजीत यांना मिळालेल्या स्पेशल पॉवरमध्ये अरबाजने निक्कीला आणि अभिजीतने पॅडी कांबळे यांना नॉमिनेशनपासून वाचवले होते. मात्र वैभव त्याला मिळालेल्या पॉवरमध्ये घन:श्यामला नॉमिनेशनपासून वाचवतो आणि त्याच्याऐवजी अभिजीतला नॉमिनेट करतो. त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, योगिता, निखिल व अभिजीत हे चार स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत होते. यापैकी निखिलचा या घरातील प्रवास संपला आहे. या घरातील निखिलचा गेम काही दिवस खराब असल्याने तो लवकरच घराबाहेर पडणार असल्याच्या चर्चा वर्तवल्या जात होत्या आणि या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या आहेत.
दर शनिवार व रविवारी होणाऱ्या ‘भाऊचा धक्का’मध्ये घरातील स्पर्धकांसाठी व प्रेक्षकांसाठी रितेश कायमच नवनवीन टास्क व खेळ घेऊन येत असतो. तसंच या रविवारी कलर्स वाहिनीच्याच ‘अबिर गुलाल’ या मालिकेतील कलाकार सहभागी झाले होते. या कलाकारांनी घरातील स्पर्धकांबरोबर एक मजेदार टास्क खेळला आणि या टास्कमध्ये घरातील सर्वच प्रेक्षकांनी सहभाग घेतला. तसंच यावेळी पायलने सूरजला राखीही बांधली. यानंतर रितेशने एक खास रुम उघडली. यात घरातील स्पर्धकांनी एकमेकांविषयीची केलेली चुगली ऐकवून दाखवली. तसंच प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही रितेशने ऐकवून दाखवल्या.
दरम्यान, ‘भाऊचा धक्का’मध्ये घरातील सर्व स्पर्धकांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले. एकमेकांची तक्रार सांगितली. तसेच एकमेकांची उणीधुणीही काढली. अशा सर्वच स्पर्धकांचा रितेशने समाचार घेतला. सर्व स्पर्धकांचे ऐकून घेतले त्याचबरोबर सर्व स्पर्धकांना ऐकवलेदेखील. अशातच ‘भाऊचा धक्का’ या भागाच्या शेवटी त्यांनी घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले आणि ही नाव होते निखिल दामले.