बॉलिवूडचे शहंशाह म्हणून ओळखले जाणारे दिग्गज व ज्येष्ठ अभिनेते म्हणून् अमिताभ बच्चन यांचा नावलौकिक आहे, गेल्या अनेक दशकांपासून अमिताभ बच्चन यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना मोहित केले आहे. असंख्य चाहते मंडळी त्यांच्या अभिनयाच्या प्रेमात आहेत. इतक्या वर्षांनीही अमिताभ यांचा जलवा कायम आहे. सध्या अमिताभ हे ‘कौन बनैगा करोडपती’चे १६ पर्व होस्ट करत आहेत. अभिनयाबरोबरच अमिताभ हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते दररोज फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे मराठी कलाकारांसह नेटकरीदेखील त्यांचं कौतुक करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सगळ्यांना नमस्कार करत आपल्या छातीवर हात ठेऊन अमिताभ बच्चन म्हणाले होते की, “मी कचरा करणार नाही”. या व्हिडिओच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी देशवासियांना स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला आहे. अमिताभ यांनी हे वाक्य मराठीमध्ये म्हटलं होतं. पण यावेळी अमिताभ बच्चन यांच्यातून शब्द उच्चारताना चूक झाली. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा व्हिडीओ करत आपली ही चूक मान्य केली आणि माफी मागितली आहे.
या व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, “नमस्कार मी अमिताभ बच्चन. काही दिवसांपूर्वी मी व्हिडीओ केला होता की, मी कचरा करणार नाही. ते मी मराठीमध्ये म्हटलं होतं. मी ‘कचरा’ या शब्दाचा उच्चार चुकीचा केला होता. माझा मित्र सुदेश भोसलेने सांगितलं, तुम्ही कचरा शब्दाचा उच्चार चुकीचा केला आहे. तर मी हा परत व्हिडीओ करतो आणि म्हणतो, मी कचरा करणार नाही. धन्यवाद.” तसंच या व्हिडीओसह त्यांनी कॅप्शनमध्ये “एका व्हिडीओमध्ये चुकीचा उच्चार केला होता. म्हणून दुरुस्त केलं आहे. क्षमस्व” असं म्हणत माफी मागितली आहे.
अमिताभ यांच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केलं आहे. अभिजीत खांडकेकर, अमृता देशमुख, के के मेनन, मुग्धा गोडबोले, ऋजुता देशमुख, नम्रता गायकवाड यांसह अनेक मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत आणि अमिताभ यांच्या या कृतीचे कौतुक केलं आहे. “चूक मान्य करायलाही मोठी काळीज लागतं”, “म्हणूनच तुम्ही महान आहात”, “नम्रतापूर्वक आदर” अशा अनेक कमेंट्स करत मराठी कलाकार मंडळींसह व नेटकरी मंडळी त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरजचं डीपी दादाला उलट उत्तर, अंकिताची मध्यस्थी, म्हणाली, “त्यांना असं बोलू नको कारण…”
दरम्यान, अमिताभ हे २७ जून रोजी रिलीज झालेल्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात शेवटचे दिसले होते. या चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता प्रभास हे मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर आता अमिताभ हे रजनीकांत यांच्याबरोबर ”वेट्टैयान’ या चित्रपटात दिसणार आहेत. येत्या १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहते मंडळी या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.