Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला सुरुवात झाली असून यंदाच्या पर्वाचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करत आहे. दरवर्षी दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर हे शो होस्ट करत असत. ‘बिग बॉस’ हा शो मराठीत सुरू झाल्यापासून निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीच या शोचं होस्टिंग केलं होतं. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या चार सिझननी प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र यंदाच्या पर्वामध्ये ते दिसणार नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यंदाच्या बिग बॉसच्या नवीन पर्वात मांजरेकर होस्टिंगसाठी का नाहीत याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Mahesh Manjrekar on Bigg Boss Marathi New Season Hosting)
अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाच्या होस्टिंग न करण्याबद्दल सांगितले. यावेळी त्यांना “या सीझनला तुम्ही का नाहीत?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत महेश मांजरेकरांनी असं म्हटलं की, “होस्ट करायच्या आधी मी ‘बिग बॉस’ हा शो कधीच पाहिला नव्हता. एका घरात काही लोक बसलेत त्यांना काय बघायचं? असं मला तेव्हा वाटलं. पण होस्ट करायच्या वेळी मी जेव्हा ‘बिग बॉस’ हा शो पाहिला. तेव्हा मला लक्षात आलं की, हा खेळ खुप रंजक आहे”.
पुढे त्यांनी असं म्हटलं की, “मी हा शो केला तेव्हा माझं कॉन्ट्रॅक्ट (करार) फक्त एका वर्षासाठीच झालं होतं. पण मग एक, दोन, तीन, चार पर्व झाले. पण पाचव्या पर्वाला त्यांना खरंच वाटलं असेल की, सारखं सारखं तेच तेच होत आहे. त्यांना जे हवं आहे ते कमी असेल. पण पाहिल्यांदा मला घेतलं तेव्हा मला असं वाटलं होतं की मलाच का कारण तेव्हा खूप स्टार्स होते. त्यामुळे या पर्वाला रितेशचं नाव ऐकल्यावर मला असं वाटलं की क्या बात है. म्हणजे नशीब त्यांनी पहिल्याच सीझनला त्याला घेतलं नाही, नाहीतर मी केलंच नसतं”
यापुढे महेश मांजरेकर असं म्हणाले की, “चार वर्षे मी हा शो खूप एन्जॉय केला आणि होस्ट बदलायचा की नाही हे शेवटी त्यांच्या हातात आहे. यावर्षी मी तितक्याच उत्सुकतेने बघेन हा शो. मी दरवर्षी बघायचो. कारण मला बोलायचं असायचं. तेव्हा त्यांच्याबरोबर बोलायला मज्जा यायची. मी जे केलं त्यासाठी मी समाधानी आहे. पण मला असं वाटतं की लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल मलादेखील बघायचा आहे”.