‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून बऱ्याच चर्चा रंगल्या. रितेश देशमुख कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करणार म्हटल्यावर अनेकांच्या भूवया उंचावल्या. शोचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून या नव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात आले. आता अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. काही स्पर्धकांची आता घरामध्ये एन्ट्री झाली आहे. याचविषयी सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगत आहे. मराठीमधील काही सुप्रसिद्ध कलाकार या शोमध्ये सहभागी झाले आहेत.
वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर, निखिल दामले, कीर्ती किल्लेकर, योगीता चव्हाणनंतर आता अभिजीतची एंट्री झाली आहे. पहिल्या प्रोमोपासूनच अभिजीतच्या नावाची चर्चा रंगली होती आणि या चर्चा आता अखेर ठरल्या आहेत. ‘इंडियन आयडॉल’ फेम गायक अभिजीतने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे.
गायक अभिजीत सावंतसह या घरात आणखी दोन स्पर्धकांची एंट्री झाली आहे आणि यापैकी एक स्पर्धक म्हणजे छोटा पुढारी म्हणून लोकप्रिय असलेला घनश्याम दरवडे. तर दुसरी स्पर्धक परदेसी गर्ल इरिना रूडाकोवाने घरात प्रवेश केला आहे. परदेशी गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली ही स्पर्धक बिग बॉस मराठीमध्ये धिंगाणा घालणार आहे.
दरम्यान, नुकतीच ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.