मराठी सिनेसृष्टीत सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे क्रांती रेडकर. क्रांतीने आजवर तिच्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावरही क्रांती बऱ्यापैकी सक्रिय असते. अनेक हटके व्हिडीओ बनवून ती सोशल मीडियावर शेअरदेखील करत असते. अभिनेत्रीच्या या व्हिडीओला चाहतेमंडळी भरभरुन प्रतिसाद देताना दिसतात. याशिवाय क्रांती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. क्रांतीने समीर वानखेडे यांच्याशी लग्न केले आहे. समीर यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत आलेल्या संकटावेळी क्रांतीने त्यांची खंबीरपणे साथ दिली. (Kranti Redkar)
नुकतीच क्रांतीने कांचन अधिकारी यांच्या ‘बातो बातों में’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी कांचन अधिकारी यांनी क्रांतीबरोबर खूप गप्पा मारल्या. “जेव्हा आपलं लग्न होतं आणि लग्नाआधी आपण आपल्या आई-वडिलांजवळ राहतो तेव्हा आपल्याला त्या वातावरणाची सवय असते, पण लग्नानंतर अचानक सर्व बदलतं. तू पण वेगळ्या जातीत लग्न केलंस, त्यामुळे एका दिवसात आजूबाजूचं संपूर्ण वातावरण बदलून जातं. आदल्या दिवशी तुम्ही क्रांती रेडकर असता, आणि जसं लग्न होतं तशा तुम्ही कोणाच्या तरी काकी, मामी बनता. काकी, मामी अशी हाक आपल्याला ऐकू येते. तर तुझ्या आयुष्यातील लग्नानंतरचा पहिला दिवस कसा होता?”, असा प्रश्न क्रांतीला कांचन अधिकारी यांनी विचारला.
आणखी वाचा – लेकीच्या लग्नाला जाणार नाहीत शत्रुघ्न सिन्हा?, म्हणाले, “तिला तिचा जोडीदार…”
या प्रश्नाचं उत्तर देताना क्रांती म्हणाली, “माझ्या आयुष्यातील लग्नानंतरचा पहिला दिवस हा साधारण होता. कारण माझ्या घरात फक्त मी आणि समीर राहतो. आमच्या सगळ्यांचे कुटुंब विभक्त आहेत. माझी नणंद वेगळी राहते, माझे सासरे वेगळे राहतात आणि मी व समीर वेगळे राहतो. असे आम्ही तीन वेगळ्या घरात राहतो. मी व समीर कॉलेजपासूनचे मित्र असल्याने आमची मैत्रीही तशी खास आहे. आम्ही रुईया कॉलेजचे आहोत. आणि तो पाच वर्ष माझ्या वर्गात होता. पण तेव्हा असं काही आम्ही बोललो नाही”.
पुढे ती म्हणाली, “मला फक्त तो माझ्या वर्गात आहे इतकंच माहित होतं. पण कधी बसून गप्पा वगैरे मारल्या असं फारसं झालं नाही. त्यामुळे नवरा-बायको झालो असलो तरी आम्ही मैत्री विसरलेली नाही. मी कॉफी बनवली, आणि दोन कप ठेवले. कॉफी पिऊन झाल्यावर तो कप उचलून घेऊन जातो, हे आमच्यातील समीकरण आहे. तो कधीच ऑर्डर सोडत नाही, त्यामुळेच मी बिघडली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संयुक्त कुटुंबाचं प्रेशर कधीच माझ्यावर आलेलं नाही”.