वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रच हादरला आहे. वैष्णवीची आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचे आरोप करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे फरार आहेत. आज या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. वैष्णवीचा १० महिन्यांचं बाळ आहे. बाळ स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी तिच्या आई-वडिलांची धडपड सुरु होती. अखेरीस आज वैष्णवीचं बाळ कुटुंबियांनी ताब्यात घेतलं. मात्र वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणामध्ये तिच्या आई-वडिलांनाच सातत्याने दोष दिला जात आहे. याबाबतच सविस्तर आढावा घेऊया. (Vaishnavi Hagawane Death Case)
प्रेमविवाह, छळ सहन करत…
सासरच्या मंडळींकडून छळ, शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने टोकाचं पाऊल उचललं. तिच्या शवविच्छेदन अहवालातून ही आत्महत्या नसल्याचं समोर आलं. वैष्णवीचा लग्नानंतर छळ सुरु झाला. काही महिने तिने आई-वडिलांपासून हे संपूर्ण प्रकरण लपवलं. मात्र त्रास वाढत गेल्यानंतर वैष्णवीने आई-वडिलांना सुरु असलेल्या छळाबाबत सांगितलं. वैष्णवीने स्वतःच्या मनाने तिचा आयुष्यभराचा जोडीदार निवडला होता. त्यामुळे कुटुंबियांना होणारा त्रास सांगणार कसं? म्हणून ती काही दिवस शांत राहिली. हा सगळा घटनाक्रम वैष्णवीच्या आई-वडिलांनीच सांगितला.
हुंडा देऊनही आणखी हाव
त्याचबरोबरीने वैष्णवीच्या आई-वडिलांनी काही धक्कादायक खुलासेही केली. लग्नात ५१ तोळे सोनं, ५० लाखांची फॉर्च्युनर देऊनही हगवणे कुटुंबियांच्या मागण्या वाढतच राहिल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार आणि मागण्यांनुसार वैष्णवी आई-वडिलांकडे कधी ५० हजार तर कधी एक लाख मागतच राहिली. लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या श्रावण महिन्यांत वैष्णवीच्या सासरकडच्या मंडळींनी तिच्या आईकडे चांदीची भांडी मागितली. तेव्हा त्यांनी चांदीच्या भांड्यांचा सेट, ५-६ किलोची देवाची मुर्ती, दीड लाखांचा फोनही गिफ्ट दिला. इतकंच काय तर जावयाने सासऱ्यांकडे दोन-तीन महिन्यांपूर्वी दोन कोटींची मागणीही केली होती. वैष्णवीच्या वडिलांनीच हा संपूर्ण प्रकार सांगितला.

लेकीचा संसार वाचवण्यासाठी पाया पडले
वैष्णवीच्या आईचं एक वक्तव्य साऱ्यांनाच खटकलं. लेकीचा छळ, मारहाण पाहूनही आई-वडीलांनी काहीच पाऊल उचललं नाही. उलट लेक सासरीच राहावी म्हणून ते वैष्णवीच्या सासू-सासऱ्यांच्या पाया पडले. त्यांनी तिचा संसार वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र जिथे राक्षसीवृत्ती आणि पैशांची हाव आहे तिथे संसार टिकणारच नाही हे वैष्णवीच्या आई-वडिलांच्या बहुदा मनातच आलं नाही. गेल्या महिन्यात तर वैष्णवीला तिच्या नणंदेने बेदम मारलं, तोंडावर थुकली, तिला घाणघाण बोलली. मात्र लेक सासरीच राहावी म्हणून आई-वडिलांनी पुढे काहीच पाऊल उचललं नाही. शेवटी लेकीचा मृतदेह पाहण्याची वेळ कस्पटे कुटुंबियांवर आली. या संपूर्ण प्रकारावर वैष्णवीच्या आई-वडिलांना सोशल मीडियाद्वारे विविध प्रश्न विचारले जात आहेत.
आणखी वाचा – सासू-सासरे, नणंद, दीराने मारत कपडे फाडले, कोणत्याही थराला जाऊन…; हगवणेंच्या मोठ्या सूनेचे धक्कादायक आरोप
वैष्णवीच्या आई-वडिलांनाच दोष
ते मागत राहिले तुम्ही देत गेलात हिच मोठी चूक, इथे आई-वडिलच चुकले, मुलीला होत असलेला त्रास माहित असूनही तुम्ही तिला घरी का आणलं नाही?, लेकीचा संसार वाचवता वाचवता तुम्ही तिला गमावलं, आई-वडीलांनी मुलीला पुन्हा सासरी राहायला का पाठवलं?, मुलीच्या त्रासापेक्षा तिने सासरीच राहावं यासाठी आई-वडिलांनी केलेले प्रयत्न चुकीचे होते, आई-वडिलही कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहेत… असे अनेक प्रश्न विविध माध्यमांद्वारे वैष्णवीच्या आई-वडिलांना विचारले जात आहेत. पण चूक कोणाची? या चर्चेमध्ये गुंतण्यापेक्षा वैष्णवीच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर योग्य ती शिक्षा मिळावी आणि पुढे हुंडाबळी जाऊ नयेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे एवढंच…