Swapnil Rajshekhar Video : रस्त्यावर चालणंही आता कठीण होऊन बसलं आहे. बरेचसे ड्रॉयव्हर मंडळी स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवाचा विचार न करत वाहन चालवतात. त्यांच्या या चुकीच्या पद्धतीच्या वाहन चालवल्याने इतरांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. अपघाताच्या अनेक घटना याचमुळे घडतात. गाडी चालवताना फोन कॉल्स घेणे अत्यंत चुकीचं आहे, आणि याचे परिणामही गंभीर आहेत. याचाच एक व्हिडीओ एका मराठमोळ्या अभिनेत्याने शेअर करत चांगलंच सुनावलं आहे. गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्यांना या मराठमोळ्या अभिनेत्याने चांगलाच टोमणा दिला आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी व्हिडीओ शेअर करत गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्याचे कान टोचले आहेत.
या व्हिडीओमध्ये स्वप्नील राजशेखर असं बोलताना दिसत आहेत की, “ही जी चालत्या टू व्हीलर वरुन एका कानाला फोन लावून गाडी चालवणारी माणसं असतात ती साधीसुधी माणसं नसतात. तुम्ही त्यांना सामान्य माणसं समजू नका ती खूप महत्त्वाची माणसं आहेत. त्यांच्यावर खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत असं मला वाटतं. आपल्या देशाची सुरक्षा जवळपास यांच्याच हातात आहे. आपले अँटी टेरिरिझम स्कॉड आहेत ना त्यांचे स्लीपर सुद्धा यांना फोन करतात. आपल्या देशात शत्रू राष्ट्राच्या कुठे कुठे विघातक कारवाया चालू आहेत , कुठे अतिरेकी कारवाया करायचं त्यांच प्लॅनिंग चालू आहे या सगळ्याची ही माणसं माहिती काढतात”.
आणखी वाचा – ‘चला येऊ द्या फेम’ अभिनेत्याचा मोठा निर्णय, पत्नीसह अवयवदान करणार, चाहत्यांकडून कौतुक
पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “त्याची माहिती लागली की, ते लगेच टू व्हीलरवर असतील तरीही पीएम ऑफिसला फोन लावतात. यांच्याकडून थेट पंतप्रधानांकडे माहिती जाते. ही ही माहिती आम्हाला मिळाली आहे आणि इथे बॉम्ब फुटणार आहे. यांनी दिलेल्या माहितीनंतर तो बॉम्ब रिकामी केला जातो. त्यांच्याकडे बाजूला उभं राहून बोलावं एवढा सुद्धा वेळ नसतो. बॉम्ब फुटला तर करायचं काय त्यामुळे ही माणसं चालत्या गाडीवरुन बोलत जातात”.
पुढे ते असंही म्हणाले आहेत की, “स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात. एवढी रिक्स ते आपल्यासाठी घेतात असा माझा अंदाज आहे. त्यामुळे चालता गाडीवर एका कानाला फोन लावून जाणारी माणसं दिसली तर त्यांच्यावर चिडू नका. त्यांना शिव्या घालू नका सेल्युट करा”.