soldier duty over marriage : आजच आमची लग्नाची सत्यनारायणाची पूजा झाली. माझं कुंकू मी देशाच्या सेवेसाठी पाठवत आहे… जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील यांच्या पत्नीचं हे बोलणं हृदयाला चटका लावणारं आहे. सैन्यात भरती झालेल्या मनोज यांचं ५ मेला थाटामाटात लग्न झालं. ते सुट्टीवर होते. मात्र भारत-पाकमधील तणाव पाहता त्यांची सुट्टी रद्द करण्यात आली. मनोज यांना लगेचच सेवेत रुजू होण्यासाठी फोन आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पुन्हा भारतमातेच्या सेवेला हजर राहण्याचा निर्णय घेतला. अंगावरची हळदही निघाली नसताना मनोज त्यांच्या कर्तव्यावर हजर झाले. त्यांच्या पत्नीची, कुटुंबियांची सुरु असेलेली मनाची घालमेल शब्दांमध्येही मांडता न येणारी आहे.
लग्न झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी मनोज देशाच्या रक्षणासाठी तैनात झाले. नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची मुलगी यामिनीशी मनोज यांचं लग्न थाटामाटात पार पडलं. यामिनीच्या हातावरची मेहंदीही जशीच्या तशी होती. ज्या दिवशी मनोज देशसेवेसाठी निघाले तेव्हा त्यांच्या लग्नाची सत्यनारायणाची पूजा होती. हे आनंदाचे व गोड क्षणही मनोज यांना पत्नीसह अनुभवता आले नाहीत. यावेळी कुटुंबिय व पत्नी यामिनी यांना अश्रू अनावर झाले.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी
पत्नी यामिनी म्हणाली, “माझे पती देशसेवेसाठी जात आहेत याचा मला खूप अभिमान आहे. आज आमची सत्यनारायणाची पूजा होती. तरीही मी त्यांना देशसेवेसाठी जाण्यास पाठिंबा देत आहे. देशासाठी जा. देशाचं संरक्षण मला महत्त्वाचं वाटतं”. पती मनोज यांच्याबाबत बोलताना यामिनी यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा पूर आला होता. मनातील भावना डोळ्यांमध्ये दिसून येत होत्या. मात्र देशाला सैन्याची असलेली गरज पाहता काळजावर दगड ठेऊन यामिनीसह कुटुंबियांनी मनोज यांना पुन्हा कामावर जाण्यासाठी बळ दिलं.
आणखी वाचा – “आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…
मनोज यांचे वडील म्हणाले, “मला देशाचा व माझ्या मुलाचा अभिमान आहे. देशाच्या सेवेसाठी माझा मुलगा जात आहे याचा मला अभिमान आहे. त्याचं नुकतंच लग्न झालं आहे. आमची सूनबाईही आम्हाला पाठिंबा देत आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबियांच्या त्याला शुभेच्छा आहेत. माझा उर अभिमानाने भरुन आला आहे”. लेकाबाबत बोलताना वडिलांचेही डोळे पाण्याने भरुन आले होते. संपूर्ण कुटुंबीय रेल्वेस्थानकात मनोज यांना सोडण्यासाठी आलं होतं. मनोज यांना देशवासियांकडून मानाचा मुजरा आणि अभिमान…