Sajana Upcoming Movie : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रसिद्ध चित्रकार श्री. शशिकांत धोत्रे यांच्या नवनिर्मित चित्रकृतींच्या प्रदर्शनास भेट दिली. या प्रदर्शनात त्यांनी धोत्रे यांच्या विविध कलाकृतींचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या अप्रतिम चित्रशैलीला दाद दिली. चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या कलाप्रदर्शनास भेट देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथेच उपस्थित असलेल्या ‘सजना’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमकडून चित्रपटाचा टिझरही पाहिला. टिझर पाहिल्यानंतर त्यांनी सिनेमाच्या संकल्पनेचे कौतुक करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आणि उत्सुकता व्यक्त केली.
‘सजना’ चित्रपटासाठी मा. फडणवीस यांनी मराठी सिनेसृष्टीला नवसंजीवनी देणाऱ्या अशा कलाकृती अधिकाधिक यशस्वी होवोत, असे मत व्यक्त केले. ‘सजना’ सिनेमाचे दिग्दर्शक शशिकांत धोत्रे म्हणाले, ‘सजना’ या सिनेमात नवोदित कलाकार असणार आहेत. लवकरच या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. हा सिनेमा रोमँटिक असणार आहे. सिनेमाचे कथानक हे सत्यघटनेवर आधारित असण्याबरोबर काल्पनिकदेखील आहे. मला आधीपासूनच दिग्दर्शक व्हायचे होते. पण अपघाताने चित्रकार झालो आहे. त्यामुळे या सिनेमासाठी मी खूप उत्सुक आहे”.
आणखी वाचा – अपघातानंतर पनवदीपवर सहा तास शस्त्रक्रिया, शुद्धीत आल्यानंतर पहिला फोटो समोर, आता परिस्थिती अशी की…
पुढे ते म्हणाले, “चित्रकार म्हणून तुम्ही मला ओळखत असाल. मला स्पष्ट आठवत ही नाही तेव्हापासून मी चित्र काढत आलो आहे. प्रोफेशनल चित्रकार व्हायच्या आधी जेव्हा मी कशात करियर करणार आहे हे मला ही ठाऊक नव्हतं, पण तेव्हापासुन आजतागायत एक स्वप्न मात्र मी उराशी बाळगून होतो. ते स्वप्न मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येतोय”.
शशिकांत धोत्रे यांचे चित्रकलेतील योगदान हे महाराष्ट्राच्या कलासंस्कृतीसाठी अत्यंत मौल्यवान आहेच पण त्याचबरोबर सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाची म्हणजेच ‘सजना’ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. प्रेमाच्या विविध पैलूंना उजागर करणाऱ्या आणि प्रेक्षकांना एक नवीन सिनेमॅटिक अनुभव देणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे यांनी केलं आहे. ‘सजना’ सिनेमा २३ मे २०२५ पासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.