Operation Sindoor : आज भारतात ऑपरेशन सिंदूर या यशस्वी मोहिमेचा आनंद साजरा केला जात आहे. जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दोन आठवड्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तान आणि पीओकेवरील ९ ठिकाणांवर एअरस्ट्राइक करत बदला घेतला. पहलगाम हल्ल्यात भारतातील निष्पाप २६ पर्यटक मारले गेले. आणि त्यांचे हे मरण त्यांच्या कुटुंबासमोर आले. याने शहीद झालेल्या प्रत्येक भारतीयाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नींनी डोळ्यादेखत नवऱ्याचा मृत्यू पाहिला तर काही मुलांसमोरच त्यांच्या वडिलांना गोळ्या झाडल्या. या दृश्याची आपल्याला साधी कल्पनाही करवत नाही तर याचा त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम झाला असेल?. अर्थात सरकारकडे न्यायाची मागणी साहजिकच आहे.
आणि हो याचं उत्तर आज मिळालं. भारताने पाकविरोधात आखलेली ऑपरेशन सिंदूर ही यशस्वी मोहीम. भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी व लेकीने , शुभम द्विवेदीच्या पत्नीने, तसेच विजय नरवाल यांच्या आईने समाधान व्यक्त केले आहे.
आणखी वाचा – भारताकडून पाकिस्तानला करारा जवाब, मोहिमेला Operation Sindoor हे नाव का दिलं?, वाचा सविस्तर
पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे म्हणाल्या की, “दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे आपल्या मुलींचे कुंकू पुसले, त्याला हे एक योग्य प्रत्युत्तर आहे. या ऑपरेशनचे नाव ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आले. मी सरकारचे मनापासून आभार मानते”.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शुभम द्विवेदीची पत्नी ऐशान्याने यावर प्रतिक्रिया देत सांगितलं की, “मी पंतप्रधान मोदींची खूप आभारी आहे. त्यांनी माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्यावर जो विश्वास होता, त्यांनी प्रतिसाद देत आमचा विश्वास कायम ठेवला आहे. शुभमला ही खरी श्रद्धांजली असेल. आज तो जिथे कुठे असले त्याला नक्कीच शांती मिळाली असेल”, हे सांगताना ऐशान्या भावूक झालेली दिसली.
आणखी वाचा – “भारत माता की जय”, ‘ऑपरेशन सिंदूर’वर कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “घरात घुसून मारणार…”
सैनिक विजय नरवाल यांच्या आईने प्रतिक्रिया देत म्हटलं की, “मोदीजींनी खूप चांगलं काम केलं आहे. मी त्या सैनिकांना प्रोत्साहन देऊ इच्छिते जे सीमेवर लढा देत आहेत. आणि याचं मार्गाने मी देशाच्या काहीतरी कमी येऊ इच्छिते. या हल्ल्याने माझ्या लेकाच्या मृत्यूचा काहीतरी बदला घेतला गेला आहे. आणि अजून मुळापासून हा बदला घेतला जावा असं मला वाटतं. नव्या लग्न झालेल्या मुलींचे सिंदूर पुसले गेले त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे योग्य नाव या मिशनला दिले आहे. हा खूप मोठा संदेश आहे. बहीण, आई, मुलगी, पत्नी, विधवा या सगळ्यांच्या अश्रूंचा बदला घेतला गेला”.