बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला ही ९० च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. सध्या ती ५४ वर्षांची आहे. अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली अभिनेत्री गेल्या वर्षी म्हणजे २०२४ ला संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमधून पुन्हा पदार्पण केले. यामध्ये ती मल्लिकाजान ही भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाला चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली. मात्र वाढत्या वयामुळे तिला अनेक समस्यांचादेखील सामना करावा लागला. याबद्दल तिने एका मुलाखतीमध्येही सांगितले आहे. वय वाढल्याने तिला किती अपमान सहन करावा लागलं आणि त्यामुळे किती समस्या आल्या? याबद्दल तिने सांगितले आहे. (manisha koirala on age)
वाढत्या वयामुळे तिला बॉलिवूडमध्ये अनेक समस्या आल्या. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “आम्ही जगाला व स्वतःला सिद्ध करण्यासाठी, सतत चर्चेत राहण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. वयाच्या ५० व्या वर्षानंतरही खूप काही करु शकतो हे दाखवावे लागते. आम्ही आताही चांगले आयुष्य जगू शकतो. आम्हीदेखील आमच्या कामात चांगले बनू शकतो. आम्ही आताही खूप चांगले आणि आरोग्यदायी आयुष्य जगू शकतो. जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत मला काम करायचे आणि निरोगी आयुष्य जगायचे आहे. मला चांगलं दिसायचं आहे. हाच माझा उद्देश आहे”.
पुढे ती म्हणाली की, “मी म्हातारी झाले आहे असं अनेकजण म्हणतात. ही कशी काम करते? हादेखील खूप जण विचार करतात. आई-बहिणीची भूमिका मिळावी असंही म्हणतात. पण महिला खूप चांगल्या व ताकदीच्या भूमिका सकारु शकतात. माझ्याआधीही असे अनेक अभिनेत्रींनी केलं आहे आणि मलादेखील अशा भूमिका करायच्या आहेत. माझ्यामध्ये जोश आहे. अजून काम करण्याची भूक आहे. मला एक कलाकार म्हणून पुढे जायचे आहे. वय हा फक्त एक नंबर आहे आणि वय मला थांबवू शकत नाही”.
नंतर ती म्हणाली की, “चित्रपटसृष्टि असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र वय वाढणं ही महिलांसाठी एक समस्या आहे. आम्हाला इज्जत मिळत नाही. कोणत्याही पुरुषाला मी म्हातारं झालेलं ऐकलं नाही. पण खूप महिलांना ट्रोल केले जाते. वयामुळे पुरुषांपेक्षा अधिक चुकीची वागणूक मिळते. मला एका राऊंडटेबल कॉन्फरन्ससाठी साइडलाइन केले होते. ही कॉन्फरन्स एका खास वयाच्या ग्रुपसाठी असल्याचे सांगितले होते. त्यावेळी मी त्यांना एवढ्या वयाचा एखादा पुरुष कलाकार असता आणि चांगल्या, मोठ्या चित्रपटामध्ये काम केले असते तर त्याला या राऊंडटेबल कॉन्फरन्सपासून दूर ठेवलं असतं का? अजिबात नाही”. दरम्यान मनीषाने या मुलाखतीमध्ये तिचा राग व्यक्त केला आहे.