Ratan Tata Biopic : भारतातील आघाडीचे उद्योगपती व समाजसेवी रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सामान्य असो वा सेलिब्रिटी प्रत्येकाने हळहळ व्यक्त केली. रतन टाटा यांचे व्यक्तिमत्त्व केवळ त्यांच्या व्यावसायिक योगदानापुरते मर्यादित नव्हते, त्यांनी त्यांच्या कार्याद्वारे लाखो लोकांवर खोल व सकारात्मक प्रभाव टाकला. त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी, करुणा आणि कार्य नैतिकतेच्या कथा जगभरातील प्रत्येक सामान्य व विशेष व्यक्तीपर्यंत पोहोचू शकावा म्हणून या महान व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहण्यासाठी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL) ने त्यांच्या जीवनावर बायोपिक बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
या प्रस्तावाची घोषणा करताना, ZEEL चे MD आणि CEO पुनित गोयंका म्हणाले, “रतन टाटा यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे उद्दिष्ट त्यांच्या महानतेला व योगदानांना समोर आणणे हा आहे. समाजाच्या भल्यासाठी त्यांनी अगणित गोष्टी केल्या आहेत. विशेषतः तरुणांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळेल”. ZEEL चे चेअरमन आर गोपालन म्हणाले, “रतन टाटा यांच्या निधनामुळे प्रत्येक भारतीयाला खूप दुःख झाले आहे. भारताला त्यांची नेहमीच आठवण येईल. Zee Studios च्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट त्यांची स्मृती जिवंत ठेवेल आणि लाखो लोकांना शोधण्यात मदत करेल”.
झी स्टुडिओने या बायोपिकचा नफा सामाजिक कारणांसाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट १९० पेक्षा जास्त देशांमध्ये नेण्यासाठी कंपनी WION बरोबर सहयोग करत आहे. झी स्टुडिओचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश बन्सल यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की, “रतन टाटा सारख्या महान व्यक्तिमत्वाच्या चरित्रावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांचे योगदान जगाला कधीही विसरता येणार नाही”.
झी मीडियाचे सीईओ करण अभिषेक सिंग म्हणाले, “रतन टाटा सारख्या महान व्यक्तीचा वारसा साजरा करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या उपक्रमाशी जोडले गेल्याने आम्हाला सन्मान वाटतो”. रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातून प्रेरणा घेऊन लाखो लोक त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल.