सासरच्या मानसिक छळाला कंटाळून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच (Vaishnavi Hagawane) प्रकरण आजही ताजं आहे. २३ वर्षीय वैष्णवीने सासरच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळत आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं. राहत्या घरातच गळफास घेत वैष्णवीने स्वतःला संपवलं. वैष्णवीच्या मृत्यूची बातमी समोर येताच याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. तर वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार झालेले तिचे सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांनादेखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच आता वैष्णवी हगवणे संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Vaishnavi Hagawane Death Case)
वैष्णवीने ज्या दिवशी आत्महत्या केली अगदी त्या दिवसापर्यंत तिला घरच्यांनी मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे. शव विच्छेदनातून आलेल्या अहवालात वैष्णवीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे एकूण २९ व्रण आहेत, त्यातील पाच ते सहा व्रण ताजे असल्याचे उघड झाले आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडून छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.
आणखी वाचा – “सून घराबाहेर पडली तरच…”, वैष्णवी हगवणेच्या दीराची पोस्ट व्हायरल, क्रुर कृत्य करतानाही असं काही बोलला की…
वैष्णवीला ज्या हत्याराने मारहाण केली आहे ते हत्यार अद्याप सापडलेलं नाही. ते हत्यार नेमके ठेवले कुठे आहे?, याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. दरम्यान, हगवणे कुटुंबाची सर्व बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तर वैष्णवीच्या माहेरहून दिलेले सोने त्यांनी तारण ठेवले असल्याचं या तपासात समोर आलं. हे सोनं नेमकं त्यांनी का तारण ठेवलं, त्या पैशांचं त्यांनी काय केलं याचा खुलासा अद्याप झालेला नाही. वैष्णवी हगवणे प्रकरणात अद्याप तपास हा सुरु आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी, मोठी रक्कम आणि दागिने लंपास, बहिणीच्या लग्नाची सुरु होती तयारी अन्…
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रच हादरला आहे. वैष्णवीची आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. वैष्णवीच्या आई-वडिलांनी लेकीची हत्या असल्याचा आरोप हगवणे कुटुंबावर केला आहे. तर, वैष्णवीच्या बाळाची कस्टडी सध्या वैष्णवीचे माहेरचे कुटुंब कस्पटेंकडे देण्यात आली आहे.