Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने एक वेगळीच उंची गाठली आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यात राहणाऱ्या आणि राजकीय कुटुंबातून असलेल्या वैष्णवीचा सासरी छळ झाला. या शारीरिक, मानसिक छळाला त्रासून वैष्णवीने आत्महत्या हे टोकाचं पाऊल उचललं. याच वैष्णवीला नऊ महिन्याच बाळ देखील आहे. आता मात्र या आई-मुलाची कायमची ताटातूट कधीही न भरून निघणारी आहे. पैशाच्या हव्यासापायी एका आई-मुलाची ताटातूट झाली. नऊ महिन्याच्या लेकराला त्याच्या आईपासून पोरकं व्हावं लागलं. चिमुकल्याला मागे सोडून जाताना त्या एका आईच्या मनाची नेमकी काय घालमेल झाली असेल याचा विचारही करवत नाही. त्या आईच्या नेमक्या आपल्या चिमुकल्यासाठी काय भावना असतील याची काल्पनिक मांडणी…
बाळा, मी तुझी आई बोलतेय. माझ्या पोटी जन्म घेऊन तुला नऊ महिने पूर्ण झालेत. आई म्हणून आतापर्यंत तुझी हाकही नीटशी कानावर आली नाही. माझ्या अंगावरच दूध पिणाऱ्या माझ्या लेकराला मागे सोडून जाताना मला असह्य झालं खरं पण यावेळेस मी स्वतःला थांबवूच शकले नाही. नऊ महिने तू पोटात असताना आणि तुझा जन्म झाल्यानंतरची नऊ महिने तुझ्या येण्याने, तुझ्या सहवासाने आनंदात गेली खरी पण या आनंदापेक्षा मिळणार दुःख हे अधिक होतं. त्या वेदना अधिक होत्या आणि असह्य करणाऱ्या होत्या. तुझ्या वडिलांशी मी प्रेमविवाह केला आणि मला आमचा राजा-राणीचा संसार सुरु झाला असं वाटू लागलं, पण काही दिवसांतच आमच्या या राजा-राणीच्या संसाराला नजर लागली आणि नरकयातना सुरु झाल्या. ज्यांना मी आपलं मानलं, ज्याच्यासाठी मी माझ्या आई-वडिलांच्या विरोधात गेले त्या तुझ्या वडिलांनीच मला दूर लोटलं. ही आपली माणसंच नव्हती हे ओळखायला मी कुठेतरी कमी पडले.
कालांतराने घरातील सगळेच माझ्या विरोधात गेले आणि त्यांच्याकडून माझ्या अंगावर झालेल्या जखमाही सहन करण्याच्या पलीकडे गेल्या. याच दरम्यान तुझ्या येण्याची चाहूल लागली आणि आशेचा किरण सापडला. अरे पण, तुझ्या येण्याच्या आनंदाच्या बातमीनंतर तर माझ्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तो आशेचा किरण तिथेच मावळला. तू आमचा मुलगा नाहीस हा संशय तर माझ्या मातृत्वाला तडा देणारा होता. त्यानंतर तुला नऊ महिने पोटात घेऊन वाढवणंही मला नकोस झालं होतं. पण आई होण्याची आशा इतकी बळकट होती की, मी जिद्दीने तुला जन्म दिला. आपल्या घरात चिमुकली पावलं रांगतायत हे कळूनही माझा छळ हा सुरुच होता.
अखेर सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर आता ठोस पावलं उचलावीत असं मनात आलं आणि तुझा काहीही विचार न करता मी कायमचा निरोप देण्याचं मनाशी पक्क केलं. मला तू समजून घेशील की नाही, माझ्याबाबत तू काय विचार करशील हे मला माहित नाही पण एक सांगते तू मोठा होऊन प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिक. एक आई म्हणून जन्म देण्यापलीकडे मी तुझं काहीच करु शकले नाही पण मला खात्री आहे तू स्वतः उत्तम माणूस बनशील.