सलमान खान लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांपैकी एक आहे. सलमान खानचे जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत. कित्येकदा तो त्याच्या चाहत्यांना मोकळेपणाने भेटतानाही दिसला आहे. पण आजकाल त्याची सुरक्षितता हा देखील चिंतेचा विषय ठरत आहे. यापुर्वीही अनेकदा अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अशातच सलमान खान संबंधित असणाऱ्या आणखी एका बातमीने साऱ्यांना धक्का दिला आहे. समोर आलेल्या बातमीमुळे सर्वांचीच चिंता वाढली असल्याचं पाहायला मिळत आहे. (Salman Khan Farmhouse)
मिळालेल्या माहितीनुसार, वाजे येथील सलीम खान (सलमान खान) यांच्या अर्पिता फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या दोघांना पकडल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच दोन जणांनी सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. दुपारी चारच्या सुमारास दोन इसम कोणतीही परवानगी न घेता अर्पिता फार्म हाऊसच्या मुख्य गेटच्या डाव्या बाजूने असलेल्या तारेच्या कंपाउंडमधून फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते.
दोघांनी स्वतःला सलमान खानचे चाहते घोषित केले. पोलिसांनी आता या दोघांची चौकशी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोन संशयित सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पाहताच तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले. यानंतर फार्म हाऊसच्या व्यवस्थापकालाही बोलावण्यात आले. संशयितांकडे चौकशी केली असता, दोघेही सलमान खानचे चाहते असल्याचे सांगितलं. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने संशयितांना पोलिसांच्या हवाले केलं.
सुरक्षा रक्षकाने दोन्ही तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन्ही तरुण संशयित असल्याच्या वृत्ताला नवी मुंबई पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांकडे बनावट आधार कार्ड सापडले आहेत. अजेश कुमार गिल व गुरुसेवक सिंग अशी संशयितांची नावे आहेत. चौकशीदरम्यान ते पंजाब व राजस्थानचे असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून हे प्रकरण संशयास्पद असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरु आहे.