BSF Jawan Return To India : पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतलेले बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. बुधवार, दि. १४ मे रोजी भारताच्या अटारी बॉर्डरवरुन ते भारतात परतले. साधारण २० दिवसांपूर्वी म्हणजेच काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी गस्तीवर असताना चुकून त्यांनी सीमारेशा ओलांडल्याने पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची गर्भवती पत्नी आपल्या पतीच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न करत होती. अशातच भारताने पाकिस्तानातील दहशतवाद विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्यास सुरुवात केल्याने, जवान पूर्णम कुमार यांच्या कुटुंबियांची चिंता आणखी वाढली. मात्र भारताने पाकिस्तानला योग्य धडा शिकवल्यानंतर अखेर बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांची सुटका केली आहे.
बंगालमधील रहिवासी असलेले बीएसएफ कॉन्स्टेबल पूरण कुमार शॉ यांना २३ एप्रिलपासून पाकिस्तानात ठेवण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव उच्च पातळीवर असताना पूर्णम कुमार शॉ यांना अटक करण्यात आली. पूर्णम हे १७ वर्षांपासून बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे वडील निवृत्त बँक कर्मचारी आहेत. गेल्या १० एप्रिलपासून भारत-पंजाब सीमेवर तैनात असलेल्या एका गस्तीपथकाचा ते भाग होते. मात्र आता पूरण कुमार शॉ भारतात परतले आहेत.
भारतात सुखरुप परतलेल्या पूरण कुमार शॉ यांचा इथवरचा प्रवास काही सोप्पा नव्हता. पाकिस्तानी रेंजर्सच्या हाती असताना त्यांना अनेकदा मानसिक छळाचा सामना करावा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांच्याबरोबर क्रूरपणे वागण्यात आले आल्याचे समोर आले. इतकंच नाही तर त्यांना खूप त्रासही सहन करावा लागला. वीस दिवस ताब्यात असताना त्यांना दात घासण्याची परवानगी नव्हती.
इतकंच नाही तर त्यांना झोपण्यासही मनाई होती. शिवाय अनेकदा टॉर्चरही करण्यात आलं. त्यांचा फक्त शारीरिक छळ नाही तर मानसिक छळही करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. विमानांच्या उडण्याचा आवाज ऐकू यावा म्हणून त्यांना एअरबेसजवळही नेण्यात आलं. पूर्णम कुमार शॉ हे १६ वर्षांपासून बीएसएफमध्ये आहेत. त्यांची नुकतीच फिरोजपूर येथे पोस्टिंग झाली होती. पाकिस्तान रेंजर्सने आयबीमध्ये नियुक्त असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दलही त्यांच्याकडून चौकशी केली. बहुतेक वेळा त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेलं जात असे. एका ठिकाणी त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांना शिवीगाळ करण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं.