Delivery Boy Motivational Video : जबाबदारी माणसाला कोणतंही काम करण्यास भाग पाडते. सध्या जगात अशी अनेक लोक आहेत जी जबाबदारीच्या ओझ्याखाली पडेल ते काम करत स्वतःचा सन्मान जपू पाहतात. समाजात आपण पाहतो ई धडधाकट माणसं तर काम करतातच पण दिव्यांग लोकही तितक्याच ताकदीने काम करु पाहतात. कोणाच्या जीवावर जगणे, कोणावर अवलंबून नसणे ही खूप मोठी शिकवण यांच्याकडून बेरोजगारांनी घ्यावी. मोठ्या पगाराची नोकरी मिळावी असा अट्टाहास करुन आपली तरुण पिढी घरात बसून दिवस ढकलत आहेत, यांना प्रेरित करणारी आज जगात अनेक उदाहरणं आहेत. या उदाहरणांपैकी एक उत्तम उदाहरण म्हणजे व्हायरल होणारा झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ.
हो. पायाने धड चालता येत नसताना डिलिव्हरी बॉय ही भूमिका उत्तमपणे हाताळत हा डिलिव्हरी दादा साऱ्यांना प्रेरणा देणारा आहे. गेली अनेक वर्ष हा डिलिव्हरी बॉय पार्सल सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. दरमहा पन्नास हजार कमाई करत काम न करणाऱ्यांना प्रेरणा असणारा हा डिलिव्हरी दादा अनेकांच्या मनावर राज्य करतोय. ‘तिखट मराठी’ ‘या युट्युब चॅनेलवर या डिलिव्हरी दादाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यांत डिलिव्हरी दादा स्वतः त्याच्या खडतर प्रवास आणि त्याच्या स्वप्नाबाबत खुलासा करत आहे.
आणखी वाचा – रात्रीचे जेवण टाळत आहात का?, असं करणं नक्की योग्य की अयोग्य?, शरीरावर होणारे परिणाम…
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये डिलिव्हरी दादा असं म्हणत आहेत की, “मला पाय नाही आहेत तरी आज मी महिन्याला पन्नास हजार रुपये कमावतो. जे काही आहे ते सर्व स्वतःच्या हिमतीवर आहे. कोणाच्या दारात नाही वा भीक मागून नाही वा काहीच नाही. कधीही हिंमत हारु नका प्रयत्न करत राहा. जे काही होईल ते चांगलंच होईल. आपण प्रयत्नच नाही केले तर काहीच करु शकत नाही. मला अनेक लोकांनी म्हटलं की, तू आयुष्यात काहीच करु शकत नाहीस. आणि अशा लोकांना मला मी काय करु शकतो ते करुन दाखवायचं आहे आणि ते मी करुन दाखवणारंच. आधी माझ्याकडे काहीच नव्हतं आणि आज माझ्याकडे जे काही आहे, मी इतका वर आलो ते झोमॅटोमुळे. या कामामुळे मी शून्यातून वर आलो आहे”.
पुढे त्याने असं म्हटलं आहे की, “जे व्हीआयपी लोक आहेत, तेसुद्धा अगदी दहाव्या मजल्यावरुन खाली येतात. त्यांना सुद्धा आम्हासारख्यांना पाहून ऊर्जा मिळते की, दिव्यांग मुलगा असून तो डिलिव्हरी करतो. पाच-पाच, सहा-सहा किलोमीटर डिलिव्हरीसाठी जातो, हे पाहून त्यांना खूप छान वाटतं. काहींना याचं नवलही वाटतं. माझीही काही स्वप्न आहेत. आई-वडिलांना चारचाकी गाडी घेऊन द्यायची आहे. आणि त्या गाडीमध्ये बसवून माझ्या आई-वडिलांना मला फिरवायचं आहे”.
शेवटी त्याने असंही म्हटलं आहे की, “माझ्या या कामाच्या ठिकाणी जसे चांगले अनुभव आले आहेत अगदी तसे वाईट अनुभवही आहेत. बरेचदा ग्राहक पार्सल घ्यायला खाली यायला नकार देतात त्यावेळी मग मी स्वतःच जातो. काहींचं तर असं म्हणणं असत की, हे काम तुला जमत नाही मग का करतोस?. यावर मी त्यांना एकच म्हणतो, भीक मागण्यापेक्षा हे काम चांगलं आहे की नाही. यावर बरेचदा असे बोलणाऱ्यांकडे उत्तरंही नसतं”.