‘टाइमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून अवघ्या घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. ‘टाइमपास’ नंतर प्रथमेशने अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा कलाकार नुकताच त्याच्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आला होता. अशातच आता तो त्याच्या आगामी सीरिजमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रथमेश लवकरच त्याच्या ताजा खबर या सीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाला आहे.
भुवन बाम आणि श्रिया पिळगांवकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ताजा खबर’ ही सीरिज गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि आता लवकरच या सीरिजचा दुसरा भागही प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेता प्रथमेश परब महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून नुकतीच या सीरिजची Wrap पार्टी पार पडली. या पार्टीचा एक व्हिडीओ प्रथमेशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेशच्या या सीरिजमधील लुक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला प्रथमेशच्या चाहत्यांनी व ‘ताजा खबर’च्या प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मात्र या व्हिडीओवरील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओवर भुवनने कमेंट करत प्रथमेशचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या बायकोलाही टॅग केलं आहे. भुवनने “माझा भाऊ कसला भारी दिसत आहे. क्षितिजा घोसाळकर तुझा नवरा खूप हॉट आहे.” असं म्हटलं आहे. यावर प्रथमेशची बायको क्षितिजानेही “हो मी तुझ्याशी सहमत आहे” असं म्हणत त्याला उत्तर दिलं आहे.
दरम्यान, ताजा खबर’ या सीरिजद्वारे प्रथमेशने ओटीटीवर पदार्पण केले असून या सीरिजच्या दुसऱ्या भागातही तो पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये त्याच्याबरबर श्रिया पिळगांवकर, अतिषा नाईक, विजय निकम व महेश मांजरेकर हे कलाकारदेखील आहेत. त्यामुळे अनेकांना या सीरिजची उत्सुकता लागून राहिली आहे.