छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘राजा राणीची गं जोडी’ आता ऑफ एअर गेली असली, तरी या मालिकेतील कलाकार काही ना काही कारणाने चर्चेत आहेत. या मालिकेतून अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे ही घराघरात लोकप्रिय झाली होती. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत ऐश्वर्याने मोनी ही भूमिका साकारली होती. या भूमिकेने ऐश्वर्याला मनोरंजन विश्वात चांगली ओळख मिळवून दिली. अशातच आता ऐश्वर्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्रीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे अबी याचे काही खास फोटो तिने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर केले आहेत. (Aishwarya Shinde Marriage)
अभिनेत्री ऐश्वर्या शिंदेने वैभव राजेंद्रबरोबर विवाहगाठ बांधली आहे. याचे खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोमवार १० नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या व राजेंद्र यांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी त्यांच्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत “१०.११.२४” अशी त्यांच्या लग्नाची तारीख देत त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोवर रुचिरा जाधव, शिवानी बावकर, भाग्यश्री लिमये यासह अनेक कलाकार व चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – ऐश्वर्या नारकरांच्या व्हॅनिटी बॅगमध्ये नक्की काय काय असतं?, तितीक्षा तावडेने दाखवला Inside Video
ऐश्वर्या व वैभव यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे आणि त्यावर आकर्षक असा लूक केला आहे. तर अभिनेत्याने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता व त्यावर लाल रंगाचे धोतर असा लूक केला होता. ऐश्वर्या व वैभव यांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता सुमित पुसावळेदेखील या लग्नाला उपस्थित होता. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. अभिनेता आपल्या पत्नीबरोबर या लग्नासाठी पोहोचला होता. यानिमित्त त्याने दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
ऐश्वर्या अभिनेत्री असण्याबरोबर वैभव हादेखील एक कलाकार आहे. वैभव अभिनेता, गायक व डबिंग आर्टिस्ट आहे. त्याने कलर्स मराठीवरील ‘बाळूमामांच्या नावाने चांगभलं’ व स्टार प्रवाहवरील ‘कुण्या राजाची तू गं राणी’ अशा काही लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तर ऐश्वर्या सध्या भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’ व ‘तू तू मी मी’ नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.