लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतलं जातं. सोशल मीडियावरही या अभिनेत्रीचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. ही अभिनेत्री म्हणजेच अपूर्वा नेमळेकर. मालिकाविश्वात अपूर्वाने महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सध्या अपूर्वा ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून सावनी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. अपूर्वाला ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता या भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या भूमिकेमुळे अपूर्वा घराघरांत पोहोचली. (Apurva nemalekar emotional post)
अभिनयाशिवाय अपूर्वा सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरुन ती नेहमीच ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शिवाय ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसह शेअरही करते. अशातच अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या भावुक पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अपूर्वाने ही पोस्ट तिच्या भावासाठी केली आहे. गेल्या वर्षी अपूर्वाच्या भावाचं निधन झालं. त्याच्या आठवणीत अपूर्वाने भावुक होत ही पोस्ट शेअर केली आहे.
यावेळी अपूर्वाने तिच्या भावाबरोबरचा फोटो शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असे म्हटलं की, “भाऊ तू मला खंबीर राहायला शिकवलं आहेस पण मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही आहे. तू या जगात नाही आहेस याचा स्वीकार करण्याइतकी मी खंबीर नाही. तुला जाऊन एक वर्ष झालं पण असा एकही दिवस गेला नाही की, मला तुझी आठवण आली नाही. भाई आय मिस यु आय लव यू”, असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट केली आहे. अपूर्वाच्या भावाचं गेल्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ओमकारने वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ओमकारच्या निधनानंतर अपूर्वा आणि तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सोशल मीडियावरुन तिने याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली होती.
सध्या अपूर्वा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून सावनी या नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहे. या भूमिकेतून ती प्रेक्षकांची मन जिंकत आहे.